"तू मला अगदी सख्ख्या भावासारखं वागवलंस..."; भाईजानच्या वाढदिवशी रितेशभाऊची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:28 IST2025-12-27T15:27:14+5:302025-12-27T15:28:07+5:30
सलमान खानच्या वाढदिवशी रितेश देशमुखने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला?

"तू मला अगदी सख्ख्या भावासारखं वागवलंस..."; भाईजानच्या वाढदिवशी रितेशभाऊची खास पोस्ट
आज बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा वाढदिवस. सलमान त्याच्या ६० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करत आहे. मध्यरात्री सलमान खानने त्याच्या फार्महाऊसवर मीडियासोबत वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरातील चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेता रितेश देशमुखने सलमानला प्रेमळ अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेशभाऊच्या भाईजानला शुभेच्छा
रितेश देशमुखने सलमान खानसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन रितेश लिहितो, "माझ्या प्रिय भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझा आजचा दिवस प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेला असावा, हीच सदिच्छा. तू माझ्यासाठी काय आहेस, हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. तू नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि कोणत्याही अटींशिवाय उभा राहिला आहेस. तू मला अगदी सख्ख्या भावासारखं, कुटुंबासारखं वागवलंस. भाऊ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
अशा शब्दात रितेशने सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि सलमानचं नातं आपल्या सर्वांना माहितच आहे. रितेशच्या आग्रहास्तव सलमानने 'लय भारी', 'वेड' या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला. आता सलमान खान पुन्हा एकदा रितेशच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमात खास भूमिकेत दिसणार आहे. सर्वांना रितेश आणि सलमानला पुन्हा एकदा मराठी सिनेमात एकत्र पाहण्याची उत्सुकता आहे.