"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:15 IST2025-05-10T15:14:37+5:302025-05-10T15:15:13+5:30
Kangana Ranaut : कंगना राणौतने पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली.

"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या बेधडक विधानांमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता भारत-पाक तणावादरम्यान, कंगनाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पाकिस्तानचे वर्णन 'दहशतवाद्यांनी भरलेला वाईट देश' असे केले आणि 'पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकले पाहिजे.', असेही म्हटले.
कंगना राणौतने पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी भारताच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडला. हे ड्रोन हल्ले जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू, सांबा, सतवारी आणि उधमपूर, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर आणि राजस्थानमधील बिकानेर आणि जैसलमेर या भागात करण्यात आले.
कंगना म्हणाली...
पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यानंतर, कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्रामवर WION चा एक न्यूज रिपोर्ट पुन्हा शेअर केला आहे. या रिपोर्टमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या रिपोर्टसह कंगनाने पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, "ब्लडी कॉकरोच... दहशतवाद्यांनी भरलेला एक भयानक, वाईट देश... जगाच्या नकाशावरून पुसून टाकला पाहिजे."
कंगनाने केले भारतीय लष्करी कारवाईचे समर्थन
भारताच्या लष्करी प्रतिसादाचे समर्थन करण्याची कंगनाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिने अमृतसरजवळून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये भारतीय S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे कौतुक केले होते. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने जम्मूच्या लोकांना धमक्यांदरम्यान खंबीर राहण्याचे आवाहन केले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते, "जम्मू निशाण्यावर! भारतीय हवाई दलाने जम्मूमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडला. खंबीर राहा जम्मू."
वर्कफ्रंट
कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची इमर्जन्सीमध्ये दिसली होती. कंगना दिग्दर्शित आणि अभिनीत हा चित्रपट १७ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगनाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनुपम खेर, दिवंगत सतीश कौशिक, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाख नायर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार देखील होते. आता कंगना हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.