लेखः वरळीची हिरकणी! लेकरासाठी सिस्टमला भिडणारी, मंत्र्यांना नडणारी 'आई'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:53 IST2026-04-24T10:52:24+5:302026-04-24T10:53:44+5:30
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतल्या घरी आपले तान्हुले रात्रभर एकटे असेल म्हणून रात्रीच्या किर्रर्र अंधारात अवघड किल्ला उतरणारी हिरा नावाची आई साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी होऊन गेली. ती जिथून उतरली, त्या बुरुजाला छत्रपती शिवरायांनी हिरकणीचे नाव दिले. लेकराच्या प्रेमापोटी जीव धोक्यात घालणारी ती वात्सल्यमूर्ती अजरामर झाली.

लेखः वरळीची हिरकणी! लेकरासाठी सिस्टमला भिडणारी, मंत्र्यांना नडणारी 'आई'...
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतल्या घरी आपले तान्हुले रात्रभर एकटे असेल म्हणून रात्रीच्या किर्रर्र अंधारात अवघड किल्ला उतरणारी हिरा नावाची आई साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी होऊन गेली. ती जिथून उतरली, त्या बुरुजाला छत्रपती शिवरायांनी हिरकणीचे नाव दिले. लेकराच्या प्रेमापोटी जीव धोक्यात घालणारी ती वात्सल्यमूर्ती अजरामर झाली. आता एकविसाव्या शतकात प्रत्यक्ष अवघड किल्ला उतरायची गरज उरलेली नाही. पण, राजधानी मुंबईत प्रत्येक आईसाठी रोज घराचा उंबरा ओलांडला की एक लढाईच लढायची असते.
परवा मध्य मुंबईतल्यावरळी भागात अशीच एक आई मुलाच्या काळजीपोटी संतापली, तिकडे मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत तिने थेट नामदार मंत्र्यांना ‘गेट आउट फ्रॉम हिअर’ सुनावले. सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन तिला गप्प करू पाहणाऱ्या पोलिसांवरही डाफरली. ही वरळीची हिरकणी वाहतुकीच्या कोंडीत तासभर अडकली होती. मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात होती. शाळा सुटण्याची वेळ टळून गेली आणि आई अजून आली नाही म्हणून मुलगा कुठे हरवला तर काय, या चिंतेने ती सैरभैर झाली होती. कारण, केंद्रात, राज्यात, मुंबईत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षानेच रस्ता अडवला होता. कशासाठी तर तीन दिवसांपूर्वी लोकसभेत दोनतृतीयांश बहुमताच्या अभावी नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणेची घटनादुरुस्ती उधळून लावणाऱ्या विरोधी पक्षांना महिलाविरोधी ठरविण्यासाठी! त्यासाठी तीन दिवसांपासून सगळ्या पातळ्यांवर सत्ताधाऱ्यांचा त्रागा सुरू होता. तो त्रागा योग्य की अयोग्य, घटनादुरुस्तीमागे हेतू काय होते, यावर पुन्हा बोलण्याची, लिहिण्याची गरज नाही.
मुद्दा हा आहे की, इतरही शेकडो वाहनधारक कोंडीत अडकले असताना एकटी ती आईच का संतापली? आपण थेट चौकात सत्ताधाऱ्यांना, सत्ताधारी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना जाब विचारला तर कारवाई होईल, प्रसंगी तुरुंगात डांबले जाईल, याची भीती तिला वाटली नाही का?... आणि महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांची गैरसोय होईल, असे बंद, संप, निदर्शने, रास्ता रोको करू नका, असे न्यायालयांनी अनेकदा सांगितले असूनही सत्ताधारीच आंदोलन करू लागले, रस्ता अडवू लागले, जनजीवन विस्कळीत झाले तर दोष कुणाला द्यायचा? अतिवर्दळीच्या मध्य किंवा दक्षिण मुंबईत नागरिकांची गैरसोय करणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी कशी दिली?.. अशा खूपच गंभीर प्रश्नांची पृष्ठभूमी असल्यानेच मुंबईतील ही वरळीची घटना वाऱ्याच्या वेगाने देशभर, जगभर गेली. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्या अनोळखी महिलेचा संताप, तिच्या संतापाचा आवेग आणि फाडफाड इंग्रजीला उत्तर देणे शक्य नसल्याने दिङ्मुढ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्या देशाने पाहिल्या. आधी ‘गेट आउट’ व तरीही तिथून हलत नाहीत हे पाहून ‘डिडन्ट यू अंडरस्टँड’ अशा भडीमाराने कानकोंडे झालेले मंत्री गिरीश महाजन दिसले. सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी तिच्यावरच आवाज चढवून गप्प करण्याचा प्रयत्न करणारे लाचार पोलिस आणि ती पोलिसांच्या गराड्यात असताना ‘तिला बाहेर काढा नाहीतर मार खाईल’, ही सत्तेचा माज दाखविणारी मस्तवाल भाषा सगळ्यांनी पाहिली. त्यापेक्षाही सोशल मीडियावर तिची हेटाळणी व चारित्र्यहनन संतापजनक आहे. लोकसभेतील नामुष्कीपेक्षाही भाजपचे अधिक नुकसान या घटनेने झाले.
आपली व्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या ताटाखाली कशी लपलेय हेदेखील दिसले. गेल्यावर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा क्रांती मोर्चामुळे मुंबईकरांची अशीच गैरसोय झाली तेव्हा थेट न्यायालयाने आंदोलकांना तंबी दिली होती. काही वर्षांपूर्वी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना लोकल स्फोटातील मृतांना थेट रेल्वे स्टेशनवरच श्रद्धांजली वाहायची होती. तेव्हा दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे किती हाल होतील, हे सांगून त्यांना थांबविण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.
मुंबईच्या हृदयस्थानी सामान्य नागरिक, कष्टकरी, सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्यावर आंदोलनाची परवानगी मिळत नाही. सर्वत्र सत्तास्थानी असलेल्या भाजपला मात्र ती का मिळाली, या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार डोके खाजविण्याची गरज नाही. देशाच्या आर्थिक राजधानीत प्रथमच स्वबळावर महापौर बसविणाऱ्या भाजपने याविषयी अंतर्मुख होण्याची गरज आहे. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे, काळजीचे व संतापाचे विषय वेगळेच आहेत. वरळीच्या चौकातील हिरकणीच्या संतापातून सामान्यांचे जिव्हाळ्याचे विषय आणि राजकीय पक्षांचा प्राधान्यक्रम यातील गंभीर तफावत चव्हाट्यावर आली आहे.