ICC T20 Rankings:भारताच्या 'सूर्या'ची ५० धावांची खेळी पाक कर्णधार बाबर आझमला देणार धोबीपछाड

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील टी-२० मालिकेतील चौथा सामना आज असून सूर्यकुमार यादवकडे बाबर आझमला मागे टाकण्याची संधी आहे.

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील टी-२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी अमेरिकेच्या धरतीवर पार पडणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा असणार आहेत. ३१ वर्षीय स्टार सूर्याने ICC क्रमवारीत मोठी झेप घेऊन दुसरे स्थान पटकावले आहे. सूर्यकुमारच्या पुढे पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. सूर्यकुमारने विंडीजविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात आक्रमक खेळी केल्याने त्याला चांगलाच फायदा झाला आहे.

आजच्या सामन्यात सूर्यकुमारने ५० धावांची अर्धशतकीय खेळी केली तर तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकून ICC टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान होईल. कारण अव्वल स्थानापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. बाबर आणि सूर्यकुमार यांच्यामध्ये फक्त २ रेटिंग्स पॉइंटचे अंतर आहे. त्यामुळे आजच्या टी-२० सामन्यात सूर्यकुमारने ताबडतोब फलंदाजी केली तर त्याच्याकडे बाबरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल.

ICC च्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याचा समावेश पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहे. सूर्यकुमार ८१६ रेटिंग्सह दुसऱ्या स्थानावर स्थित आहे, तर बाबर आझम ८१८ रेटिंग्स पॉइंटसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बाबर आणि सूर्यकुमार यांच्यामध्ये फक्त २ रेटिंग्स पॉइंटचे अंतर आहे.

सूर्यकुमार यादवच्या आधी दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान होता. मात्र विंडीजविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्याच्या अर्धशतकीय खेळीमुळे रिझवानची घसरण झाली आणि तो तिसऱ्या स्थानावर गेला. त्यामुळे आजचा सामना सूर्यकुमार यादवसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस पाकिस्तानचा संघ टी-२० सामने खेळणार नाही त्यामुळे सूर्यकुमार लवकरच बाबरला मागे टाकण्याची चिन्हं आहेत.

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या कारकिर्दीत आतापर्यंत २२ सामने खेळून ६४८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये यादवची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ११७ एवढी आहे. सध्या वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत तो सलामीवर फलंदाजाच्या भूमिकेत खेळत असून आतापर्यंत ३ सामन्यात त्याने १११ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मागील २ वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्याने ३० सामन्यात १००५ धावा करून ICC क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यामध्ये १ शतक आणि १० अर्धशतकीय खेळींचा समावेश आहे. तर टी-२० फॉरमॅटमध्ये बाबरची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या १२२ एवढी आहे.