संजू सॅमसन-तिलक वर्मा यांनी मोडला २० वर्षांपूर्वीचा विक्रम; वाचा भारताचे ५ मोठे पराक्रम

India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनच्या शतकाने आज मोठे विक्रम केले. तिलक वर्मासोबत त्याने २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बोलंड पार्क येथे शतक झळकावणारा संजू तिसरा भारतीय ठरला आहे. २००१ मध्ये केन्याविरुद्ध सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांनी येथेच शतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याचविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संजू विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला.

संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) शतक झळकावून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिलक वर्मा व लोकेश राहुल यांनी संजूला दमदार साथ दिली. संजूने कर्णधार लोकेश राहुलसह ( २१) ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर संजू व तिलक वर्मा यांनी ११६ धावांची भागीदारी केली.

तिलक ७७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाला. संजूने ११४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ( १४ ) व अक्षर पटेल( १) मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. रिंकू सिंग ( २७ चेंडूंत ३८ धावा) व अर्शदीप सिंग ( २ चेंडूंत ७ धावा) यांनी शेवटपर्यंत खेळ करून संघाला ८ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचवले.

बोलंड पार्क येथील प्रथम फलंदाजी करताना ८ संघांनी २५० हून अधिक धावा उभ्या केल्या आणि त्यापैकी एकदाच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झाला आहे. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताच्या ६ बाद २८७ धावांचा ७ विकेट्स राखून पाठलाग केला.

संजू सॅमसन व तिलक वर्मा यांनी आज ११६ धावांची भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. मोहम्मद कैफ व दिनेश मोंगिया ( २००३, ढाका) यांच्या ११०* धावांच्या भागिदारीचा विक्रम आज मोडला गेला. विराट कोहली व सुरेश रैना यांनी २०१५ मध्ये चेन्नईत १२७ धावा केल्या होत्या.

भारताने आज ८ बाद २९६ धावा केल्या आणि भारताची दक्षिण आफ्रिकेतील चौथी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २००१मध्ये केन्याविरुद्ध ३ बाद ३५१ धावा, २००३ वर्ल्ड कपमध्ये नामिबियाविरुद्ध २ बाद ३११ धावा, २०१८ मध्ये आफ्रिकेविरुद्ध ६ बाद ३०३ धावा भारताने केल्या होत्या. आज २००३च्या वर्ल्ड कपमधील श्रीलंकेविरद्ध ६ बाद २९२ धावांचा विक्रम मोडला.