आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी संजू सॅमसन याला टीम इंडियात स्थान मिळाले. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणार का? जर संधी मिळालीच तर तो सलामीवीराच्या रुपातच खेळणार का? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. कारण गंभीरच्या मर्जीमुळे शुबमन गिलची संघात लागलेली वर्णी अन् त्याला मिळालेली उप कर्णधारपदाची जबाबदारी यामुळे संजूची अवस्था 'तळ्यात मळ्यात' अशीच काहीशी आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप आधी संजूचा लोकल लीगमध्ये धमाका
आशिया कप स्पर्धेआधी संजूनं लोकल लीगमध्ये हिट शो दाखवून देत टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव अन् कोच गौतम गंभीर या दोघांनाही खास संदेश दिलाय. फक्त विकेट किपरच्या रुपातच नव्हे तर सलामीवीराच्या रुपात तो आपली दावेदारी भक्कम करताना दिसतोय. पण शेवटी सर्व काही कॅप्टन आणि कोच काय विचार करतात? यावर देखील बरचं काही ठरेल.
सलग चौथ्या सामन्यात साधला 'फिफ्टी प्लस'चा डाव
संजू सॅमसन याने केरळ क्रिकेट लीग (KCL) २०२५ स्पर्धेतील सामन्यात 'एक से बढकर एक खेळी' करून दाखवत आपला धमाका सुरु ठेवलाय. रविवारी ३१ ऑगस्टला झालेल्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत ८३ धावांची खेळी करत कोची ब्लू टायगर्सला एकहाती विजय मिळवून दिला. या टी-२० लीगमध्ये सलग चौथ्या सामन्यात त्याच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावांची खेळी पाहायला मिळाली.
स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'
६ सामन्यातील ५ डावात १८६.८ च्या सरासरीसह कुटल्यात ३६८ धावा
संजू सॅमसन याने केरळ क्रिकेट लीगमध्ये अलेप्पी रिप्पल्स या संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २२ चेंडूत १३ धावा केल्या होत्या. त्यानंतर कोल्लम सेलर्स (Kollam Sailors) विरुद्ध त्याने ५१ चेंडूतील १२१ धावांच्या खेळीनंतर सातत्यपूर्ण अर्धशतकाला गवसणी घातली. अदानी त्रिवेंद्रम रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ३७ चेंडूत ६२ धावांची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. तृशुर टायटन्स (Thrissur Titans) विरुद्ध त्याने ४६ चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती. आता अलेप्पी रिप्पल्स विरुद्ध त्याने ४९ चेंडूत ८३ धावा कुटल्या आहेत. ६ सामन्यातील ५ डावात संजूनं १८६.८० च्या स्ट्राईकरने ३६८ धावा कुटल्या असून या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
संजू संदर्भातील नेमका काय निर्णय घेणार?
संजू सॅमसन याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील मागील १० टी २० सामन्यात ३ शतके झळकावली आहेत. डावाची सुरुवात करताना त्याने ही कामगिरी करून दाखवलीये. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हन निवडताना त्याच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन आणि कोच गौतम गंभीर ही मंडळी संजूसंदर्भातील नेमका काय निर्णय घेणार? शुबमन गिल संघात असताना संजूला सलामीची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
शुबमन गिल अन् संजू यांच्यात सर्वोत्तम कोण?
शुबमन गिल हा सातत्याने भारतीय संघासोबत आहे. पण आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचा विचार करता स्ट्राईक रेटच्या बाबतीत संजू सॅमसन त्याच्या एक पाऊल पुढे असल्याचे दिसते. एका बाजूला संजूचं स्ट्राइक रेट १५२ च्या घरात आहे. दुसरीकडे शुबमन गिल १३९ च्या आसपास आहे.