इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील समरसेट विरुद्ध ग्लॅमॉर्गन यांच्यातील सामन्यात १८ वर्षीय गोलंदाजाने हॅटट्रिकचा डाव साधत पदार्पणात इतिहास रचला आहे. १२० वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते ग्लॅमॉर्गन संघाकडून सामना खेळणाऱ्या टॉम नोर्टन याने करून दाखवलं. या कामगिरीमुळे क्रिकेट जगतात तो चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रथम श्रेणीत पदार्पणात खास विक्रम
काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ३५४ धावा करणारा समरसेट क्लब संघाने दुसऱ्या डावात निराशजनक फलंदाजी केली. अवघ्या ३२ धावांत त्यांनी ६ विकेट्स गमावल्या. टॉम नोर्टन याने २२ धावांत ४ विकेट्सचा डाव साधताना हॅटट्रिकसह नवा इतिहास रचला. या सामन्यात टॉम नोर्टन याने जेम्स रेव, टॉम लॅमनबी आणि आर्ची वॉन यांची विकेट घेत हॅटट्रिकचा डाव साधला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घे...
१२० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं
नॉर्टन हा १२० वर्षांत इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅटट्रिकचा डाव साधणारा पहिला गोलंदाज आहे. एवढेच नाही तर ग्लॅमॉर्गन क्लब संघाकडून अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा गोलंदाजही ठरला. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने हा पराक्रम करून दाखवला. याआधी १९०६ मध्ये डब्ल्यू.ई. बेन्स्किन या दिग्गजाने साउथेंड मध्ये एसेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर संघाकडून काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत हॅटट्रिक घेतली होती. याच हंगामात एच.ए. सेडगविक यानेही वॉर्सेस्टरशायर विरुद्ध यॉर्कशायरच्या संघाकडून खेळताना हॅटट्रिक घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
कोण आहे टॉम नॉर्टन?
टॉम नॉर्टन हा उजव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. मधल्या फळीत तो उजव्या हाताने फलंदाजीमध्येही उपयुक्त कामगिरी करू शकतो. काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खास करताना पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. अवघ्या १८ वर्षांच्या या युवा गोलंदाजाची इंग्लंड क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार्समध्ये गणना केली जात आहे. त्याचा वेग आणि अचूक लाइन-लेंथ यामुळे त्याने निवडकर्त्यांनाही प्रभावित केले आहे. येत्या काळात तो इंग्लंडच्या संघात दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.