Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:05 PM2022-03-08T18:05:04+5:302022-03-08T18:26:25+5:30

बहुप्रतिक्षित बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

Mithali Raj: Soon 'Shabbas Mithu', the actress who played the role of Mithali Raj, poster release, Tapasi pannu | Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडच्या 70 मिमि रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरताना दिसत  आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. या बायोपिक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रसिकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला. रसिकांनीही या चित्रपटांना डोक्यावर घेतलं. आता, टीम इंडियाची कर्णधार मिथाली राजच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. 

बहुप्रतिक्षित बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजच्या जीवनावरील सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘शाब्बास मिथू’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. सिनेमात तापसी पन्नू मितालीच्या भूमिकेत झळकली आहे. तापसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रकाशित केले आहे. विशेष म्हणजे आज महिला दिनाचं औचित्य साधून हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 


तापसीने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात हेल्मेट घेतलेली मिथाली राज म्हणजेच तापसी पन्नू दिसून येत आहे. माझ्यासारख्या लाखो युवतींची ती प्रेरणा आहे, काही रुढी-परंपरांना मोडून, पुढे जाण्यासाठी अनेकांना तिने रस्ता दाखवला आहे. महिला दिनानिमित्ताने या लढाईत लढणाऱ्या सर्व महिलांसाठी मी चीअर करते, असे कॅप्शन तापसीने ट्विटमध्ये दिले आहे. सध्या, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बायोपिक सिनेमातील भूमिका खूप आव्हानात्मक असतात. कारण एखादा स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेत असतो. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर तो त्या खेळात प्राविण्य मिळवतो किंवा यश संपादन करतो. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी तापसी स्वतःला तयार करण्यासाठी मेहनत घेत आहे. ‘दोबारा’ सिनेमाचं शूट पूर्ण केल्यानंतर लगेचच या सिनेमाच्या तयारीला तापसी लागली होती. क्रिकेटची प्रॅक्टिस करताना तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

मराठमोळी तितीक्षा तावडेही झळकणार

सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठमोळी तितीक्षा तावडेसुद्धा सिनेमात झळकणार आहे. खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे सिनेमातील तितीक्षाची ही भूमिका थोडी खास असणार आहे. तितिक्षा मालिका विश्वात प्रसिद्ध चेहरा आहे. 'सरस्वती' आणि 'कन्यादान' या मालिकांमधून ती घराघरात पोहचली.सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असून तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता बॉलिवूडमध्ये झळकणार म्हटल्यावर तिचे चाहतेही तिला पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतील हे मात्र नक्की.
 

Web Title: Mithali Raj: Soon 'Shabbas Mithu', the actress who played the role of Mithali Raj, poster release, Tapasi pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.