विरोधकांना मोठा धक्का! भाजपची दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत हातमिळवणी; अकोल्यात सत्तेचा नवा फॉर्म्युला
By सचिन राऊत | Updated: January 24, 2026 08:47 IST2026-01-24T08:46:57+5:302026-01-24T08:47:07+5:30
भाजपच्या नेतृत्वात ४४ नगरसेवकांचा गट, शहर सुधार आघाडी नावाने विभागीय आयुक्तांकडे नोंदणी

विरोधकांना मोठा धक्का! भाजपची दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत हातमिळवणी; अकोल्यात सत्तेचा नवा फॉर्म्युला
सचिन राऊत
अकोला : महानगरपालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडीत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने युतीतील दोन मित्रपक्षांसह राष्ट्रवादी (शरद पवार) व शिंदेसेनेच्या एका नगरसेविकेला सोबत घेत, शहर सुधार आघाडी या नावाने ४४ नगरसेवकांच्या गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे महापौर पदाचा उमेदवार लवकरच भाजपकडून ठरवला जाण्याचे संकेत आहेत.
महापालिकेच्या ८० नगरसेवकांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी भाजप ३८ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. सत्तास्थापनेसाठी भाजपने निकालाच्या दिवसापासूनच पुढाकार घेत, काही पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेण्यासाठी संवाद साधला होता. भाजपला विकासाच्या मुद्यावरच राष्ट्रवादी (शरद पवार) चे तीन नगरसेवक, शिंदेसेनेची एक नगरसेविका व सोबत निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) ची एक नगरसेविका व महानगर विकास समितीच्या एका नगरसेवकाने पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आता ४४ वर पोहोचले आहे. त्यांनी गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
महापौरपदाचा महिला उमेदवारही लवकरच ठरणार
भाजपकडे बहुमत झाल्याने अकोल्याचा नववा महापौर भाजपचाच होणार आहे. महापौरपदासाठी महिला उमेदवाराच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि महानगर विकास समिती यांच्या पाठिंब्याने स्थिर व मजबूत सत्ता उभी राहत असल्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
५ नावांची महापौरपदासाठी चर्चा जोरात
भाजपकडे सध्या १३ ओबीसी महिला नगरसेविका असून, त्यामधून एका महिलेच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. महापौरपदासाठी रश्मी प्रशांत अवचार आणि वैशाली विलास शेळके या दोन नावांसह पल्लवी मोरे, माधुरी क्षीरसागर, कल्पना गोटफोडे आणि मंजुषा शेळके यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम नाव कोणाचे ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विरोधी आघाडीला जबर धक्का
दरम्यान, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना आणि एमआयएमकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू असले, तरी त्यामध्ये कोणतीही ठोस फलनिष्पत्ती झाली नाही.
त्यांचे बैठकांचे सत्र सुरू असतानाच, भाजपने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन करून विरोधकांच्या आघाडीला धक्का दिला आहे. भाजपसोबत गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केलेल्यांपैकी काही नगरसेवकांनी विरोधकांच्या बैठकांनाही उपस्थिती लावल्याचे दिसत होते.