साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:41 AM2024-05-05T11:41:21+5:302024-05-05T11:57:01+5:30

Weekly Horoscope: ०५ मे ते ११ मे २०२४ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. अन्य कोणताही राशीपालट नाही. ग्रहस्थिती अशी- रवी, शुक्र, हर्षल मेषेत, गुरु वृषभेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, तर शनी कुंभेत आहे. मंगळ, राहू, नेपच्यून आणि बुध मीन राशीत आहे. १० मे रोजी बुध मेष राशीत जाईल.

या सप्ताहात रविवारी प्रदोष, सोमवारी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी, मंगळवारी दर्श अमावास्या, सत्तू अमावास्या शुक्रवारी अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आहे. शनिवारी विनायक चतुर्थी आहे. रविवारी पंचक आहे. सोमवारी सायंकाळी ५.४३ वाजेपर्यंत पंचक राहील.

आर्थिक आघाडी, शिक्षण, व्यवसाय, व्यापार, नोकरी, कौटुंबिक जीवन यांवर आगामी काळातील ग्रहस्थितीचा आपल्यावर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकतील, तर कोणत्या राशींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मेष: खर्च वाढू शकतात. प्रवासाचे सौख्य मिळू शकते. जुन्या मित्रांना भेटू शकाल. भवितव्याविषयी चिंतीत व्हाल. बाजारातून वस्तू खरेदी करण्याचे सुख उत्साह व आनंद प्रदान करेल. एखादा प्रवास किंवा तीर्थयात्रा आपल्या मित्रांसह किंवा नातेवाईकांसह होईल, ज्यात लाभ होईल. व्यापार वृद्धीसाठी अधिक आर्थिक गुंतवणूक करू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपण बाहेरगावी जाऊ शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोबल कमकुवत असल्याचे जाणवेल. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सावध राहून कामे करावीत. कुटुंबियांचा सहवास लाभदायी असला तरी काहीवेळा जुन्या गोष्टींना उजाळा मिळाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा सावध राहावे. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. मोठ्यांची आज्ञा पालन अवश्य करावी. नवीन कामाची सुरुवात करण्यास आठवडा अनुकूल आहे.

वृषभ: आठवडा अत्यंत लाभदायी आहे. ज्ञान व मनोबल वाढवणारा आहे. वैवाहिक जीवनात नवीन सौख्य लाभेल व शांतता राहील. कुटुंबिय एकमेकांना सहकार्य करतील. गुरुजनांच्या संपर्कात राहून जीवनातील कठीण परिस्थितीस शांततापूर्वक कसे सामोरे जाता येईल ते शिकून घेतील. भविष्याची काळजी अध्यात्माकडे ओढून नेईल. भक्ती व सत्संगात जाण्याचे सौभाग्य लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारी वर्गावर लक्ष्मी देवीची कृपा राहील. नवीन संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती एखाद्या संधीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. यशासह प्रगती व आर्थिक लाभ अवश्य होईल. अचानकपणे जीवनात येणारे सुख मन चांगले करेल. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन करण्यास आठवडा उपयुक्त आहे. कदाचित मित्रांच्या सहवासात अध्ययन करण्यात त्यांचे मन रमेल.

मिथुन: आठवडा नव्याने आनंद प्रदान करणारा आहे. अनेक दिवसांपासून जे कार्य पूर्ण होत नव्हते ते पूर्ण करण्यात सहकार्य प्रदान करेल. मतभेद दूर होतील. नवीन प्रेरणा मिळेल. वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. ज्ञान पूर्तीसाठी खर्च होईल. ज्याचे नियोजन अंदाजपत्रकात करणे उचित होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीच्या विषयात अधिक माहिती मिळविण्यासाठी सहकार्य मिळेल. बहुतांशी ज्ञान व विषयांसंबंधी समस्यांचे निराकरण करून घेण्यात यशस्वी व्हाल. गुरुजनांचे सहकार्य व सानिध्य लाभेल. व्यापाराशी संबंधित बाबीत लाभ संभवतो. नोकरी करणाऱ्यांना जन्मस्थानाहून दूर जावे लागू शकते. असे केल्याने त्यांची प्रगती होईल. घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. भावनात्मक निर्णय आपणास चांगली संधी प्रदान करेल.

कर्क: जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांच्या सहवासात घालवाल. मंगल कार्य, हवन-पूजा इत्यादींचे आयोजन करून मनास आनंद व शांतता लाभत असल्याचा अनुभव घ्याल. कुटुंबातील वडीलधाऱ्यां कडून मोठी आर्थिक भेट प्रदान होईल. आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती व सामाजिक स्थिती अशा तिन्ही स्थिती बलवान असतील. कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. व्यापारास आधुनिक स्वरूप देण्यासाठी नवीन साधनांचा अभ्यास करावा लागेल, तसेच त्यांच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना नशिबाची व कर्माची अशी दोघांची साथ लाभेल. खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे. बाहेरील पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नये.

सिंह: थोडी गैरसोय करणारा काळ आहे. मनोबल कमी असल्याचे जाणवेल. केलेल्या कामांचे परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवनात कौटुंबिक स्थितीमुळे कलह निर्माण होऊ शकतो. असे असून कुटुंबियांचे सहकार्य कठीण समयी लढण्याचे बळ प्रदान करेल. व्यापारी सहकारी नवीन संधी उपलब्ध करून देतील. आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी चांगली संधी व आर्थिक लाभ प्रदान करेल. आकस्मिक घटनांचा जास्त सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा कठीणच आहे. वरिष्ठांशी वाद संभवतात. उत्तरार्धात आपले कुटुंबीय व मित्र यांच्यावर प्रभाव ठसा उमटवून टाकेल. हा आठवडा आपल्यासाठी काही शिकून घेण्याचा आहे. आर्थिक उन्नती बरोबरच भविष्याची दिशा हा आठवडा नक्की करेल.

कन्या: आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात काही त्रास दिसत असला तरी उत्तरार्ध लाभ देणारा आहे. जुने मित्र भेटतील. जुने वाद संपुष्टात येण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अचानक लाभ करून देणारा आहे. एखाद्या सरकारी योजनेतून लाभ होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांना यश प्राप्ती संभवते. राजकारणातील यशामुळे किंवा राजकारणी लोकांशी संबंध स्थापित झाल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. हा आठवडा सामाजिक प्रतिष्ठा उंचावणारा आहे. व्यवहार चातुर्य व गोड बोलण्याचा स्वभाव एखादे सामाजिक पद मिळवून देऊ शकतो. विवाहेच्छुक कन्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होतील.

तूळ: आठवडा थोडे यश प्राप्त करून देणारा आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात एखादी महत्वाची जबाबदारी देणारा हा आठवडा आहे. जवाबदारी पार पाडण्यासाठी जास्त परिश्रम व बौद्धिक क्षमतेचा वापर करावा लागेल. विरोधक कामात अडथळा निर्माण करत असल्याचे दिसेल. व्यापाऱ्यांना इतर व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून स्वतःला सिद्ध करावे लागू शकते. विवाहितांना एखाद्या कौटुंबिक विवादाचे यशस्वी निराकरण करण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. भावंडांदरम्यान असलेली कटुता दूर होईल. परदेशात जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. ज्या योजना आजवर पूर्ण होत नसत त्यांच्यासाठी सहकार्य मिळून यशस्वी होता येईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल.

वृश्चिक: आठवडा अत्यंत शुभ आहे. अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वास जात असल्याचे दिसून येईल. कोणत्याही क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होऊन लोक सहमत होत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. संचित धनाची वृद्धी होईल. कामातील यश व धन लाभ यामुळे उर्जावान व उत्साहित झाल्याचे जाणवेल. अतिरिक्त प्राप्ती होण्यासाठी एखादे नवीन कार्य सुरु करू शकता. हाती एखादे मोठे कंत्राट लागू शकतो. उन्नतीस कारणीभूत ठरणारा काळ आहे. मन धार्मिक व सामाजिक कार्यात रमेल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. अध्ययन पूर्ण करू शकतील. दिनचर्येत जो बदल होईल तो मनोबल व शारीरिक बल प्रदान करणारा असेल.

धनु: आठवडा भाग्योदय करणारा असला तरी त्यासाठी आळस व अहंकाराचा त्याग करावा लागेल. काळ कोणासाठी थांबत नसतो याची जाणीव मात्र ठेवावी. एक पाऊल मागे घेऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संधी मिळत असेल तर कधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी जर एखादी जवाबदारी देण्यात आली, तर तिचे सोने करण्याचा प्रयत्न करावा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणतेही काम इतरांच्या भरवशावर करण्याची चूक करू नका, अन्यथा होऊ घातलेले काम बिघडू शकते. मुलांमुळे मान-सन्मानात वाढ करणारी एखादी संधी येईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे. अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन अध्ययनापासून विन्मुख होत असल्याचे दिसून येईल.

मकर: सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आपणास लक्षात ठेवावी लागेल. कामातील व्यस्तता शुभचिंतकांपासून व कुटुंबियां पासून दूर ठेवू शकते. दिनचर्येवर व आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबियांना थोडा वेळ द्यावा लागेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ - उतारांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी सावध राहावे लागेल. एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ जोडीदारासाठी काढावा लागेल. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. घरात मंगल कार्य होण्याची संभावना आहे.

कुंभ: जीवनात आधीपासून चालत असलेल्या समस्या दूर होऊ लागल्याचे जाणवेल. मित्रांच्या मदतीने सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कारकीर्दीस नवीन दिशा देण्यासाठी काही नवीन योजना आखाल, ज्यांची अंमलबजावणी करण्यासाठी समर्थन प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. अचानकपणे दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी अपेक्षेहून जास्त खर्च संभवतो. प्राप्तीचे नवीन स्रोत दिसल्याने पैश्याची काळजी वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी अचानकपणे मोठा भार येऊ शकतो. त्याची पूर्तता करण्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करावे लागू शकतात. घरातील व बाहेरील व्यक्तींसह राहणे हिताचे होईल. आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.

मीन: आठवडा अत्यंत शुभ आहे. क्षमतेचा उत्तम उपयोग करत असल्याचे दिसून येईल. जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा उचलण्यात यशस्वी व्हाल. कारकिर्दीशी संबंधित एखादी शुभवार्ता समजेल. पदोन्नतीमुळे निव्वळ कार्यक्षेत्रातच नाही तर कुटुंबात मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना एखादा चांगला सौदा हाती लागू शकतो. बाजारात अचानकपणे आलेल्या तेजीमुळे खूप फायदा होईल. स्वजनांसह हसत-खेळत वेळ घालविण्याच्या भरपूर संधी मिळतील. एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. आधीपासून प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यस्त जीवन शैलीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढाल.