The womens are dangerous. They can adjust themselves to any conditions | बाया डेजंर असतात.
बाया डेजंर असतात.

-अनिता पगारे

आदिवासी भागात काम करायला मी आले, ऐकून-वाचून माहितीच होतं की आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना खूप सन्मान असतो. ती संस्कृती स्त्नीप्रधान आहे. मनाशी खूपच उत्सुकता घेऊन मी इथं पोहोचले. गेल्या वर्षी जूनमधली ही गोष्ट. इथं आले तर मुसळधार पाऊस. चौकशी केल्यावर समजलं की दरवर्षी पाऊस असाच संततधार पडत असतो, मी आले म्हणून काही पाऊस जोरात नव्हता तर तो त्याच्या सवयीप्रमाणे पडत होता.

पुढे मी जरा स्थिरस्थावर झाले. एव्हाना एकेक सण सुरू झाले. वटपौर्णिमेचा दिवस. ऑफिसच्या गाडीनं मी फिल्डवर जात होते. गाडी जव्हारपासून निघाली. पहिलाच वड आम्हाला ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या जवळ लागला. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठय़ा गटारीच्या पलीकडं एक छोटंसं बाळ वडाचं झाड होतं. त्याच्या आकारमानाचा विचार न करता बाया मनोभावे त्याला नैवेद्य दाखवत होत्या, दोरा गुंडाळत होत्या. एरवी त्या बाळवडाकडे कोणी ढुंकूनही पाहात नसावं इतकी प्रचंड अडगळ त्याच्या आवतीभोवती दिसत होती. पण आयाबाया मात्र आज त्या अडचणीच्या ठिकाणी, गटार ओलांडत, मनोभावे वड पूजायला निघाल्या होत्या. आजच्यासाठी खास केलेला मेकअप, साड्या सावतर वडाला फेर्‍या घालत होत्या. उत्सुकतेपोटी आम्ही सर्वच थोडे थांबलो. वटपूजा पाहिली तर तिथं आलेल्या अगदी शहरी बाया होत्या. ज्यांचे नवरे इकडे शिक्षक आहेत, पंचायत समिती, आर्शमशाळा, आदिवासी विकास प्रकल्प अशा सरकारी नोकरीत आहेत त्यामुळं या आदिवासी भागात येऊन राहणं पदरी पडलेल्या त्या तशा दु:खी बाया होत्या. या आदिवासी भागात येताना त्यांचं शहरी राहणीमान, कपडे, सण साजरा करण्याच्या पद्धतीही घेऊन आल्या होत्या. इथं करमणुकीला दुसरं काहीच नाही. ना थिएटर, ना मॉल, ना गार्डन, ना जॉगिंग ट्रॅक. त्यामुळे  शहरात असताना साजरा करत नसतील इतक्या बारीकसारीक रीतीनं त्या इथं प्रत्येक सण साजरा करतात; पण त्या गर्दीत एकही आदिवासी बाई काही आम्हाला दिसली नाही. 

पुढं गेलो. मोखाड्यात पंचायत समितीच्या जवळ छान एक जुनं वडाचं झाड आहे, ज्याला छान पार बांधलेला आहे. पुरुषांना पाय वर करून चढता येईल एवढी त्या पाराची उंची ठेवलेली आहे. पण आज बायांचा वार. त्यांना कुठं चढता येतंय. पाराला पाय-या नाहीत. बाया एकमेकीला हात देत, खालूनही आधार देत पारावर मात्न चढतच होत्या. 

बाया ही मोठी डेंजर जमात आहे. त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्यांच्यावर लादल्या गेल्या त्या सर्व गोष्टींशी त्यांनी दोस्ती करून घेतली. आता त्या बंधनासह सहज जगतात. इतकं सहज की बंधन घालणारा शरमून जाईल. त्या दिवशीही त्या बाया ते पूजेचं ताट, साजशृंगार घेऊन चढल्या त्या पारावर. चौकशी केली तेव्हा समजलं की वडाच्या पाराला पायर्‍या बनवतच नाही. कारण सोपं आहे, इथे फक्त रिकामे ‘बापे’च येतात. दिवसभर 2-3 वडफेर्‍या चेक केल्या पण स्थानिक आदिवासी बाई काही त्या गर्दीत दिसली नाही.  आत पाड्यापाड्यांवर पोहोचलो तर त्या पाड्यांवरचे सर्व वड जागेवर कोरडेच उभे होते, रोज असतात तसेच. कोणीही मनोभावे, तिथं श्वसनाला ऑक्सिजन मिळतो म्हणून पूजा करताना दिसली नाही. चौकशी केली तर समजलं की, इथल्या सर्वच आदिवासी बाया ‘रोपं लावण्या’साठी स्वत:च्या किंवा ज्या भूमिहीन आहेत त्या इतरांच्या शेतावर मजुरीनं गेल्या होत्या. पावसाळ्याचे कामाचे दिवस. बाईचा हात रिकामा नाही. आम्ही शेतावर जाऊन काहींशी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना बोलायला वेळच नव्हता. हा सण माहीतच नव्हता. त्यांचं लक्ष सगळं भात आवणीत.

दिवसभर काम करून आम्ही साधारण चार वाजता जव्हारकडे परत फिरलो. वाटेत आम्हाला दोन जोडपी दिसली. दिवसभर प्रचंड कष्ट करून ते रिमझिम पावसात निघाले होते. दोन्ही बायकांनी गुडघ्याच्या वर नेसलेलं लुगडं आणि त्यावर साधं, गोल गळ्याचं कटोरी नसलेलं ब्लाऊज घातलेलं होतं. पुरुषांच्या अंगावर छोट्याशा अंडरवेअरवजा पॅन्ट आणि वरती टी-शर्टवजा बनियान होती. चौघेही जाम प्यायलेले होते. जमेल तसं चालण्याचा प्रयत्न करत होते. पुरुषांना जरा जास्त झाली असावी म्हणून ते अधिक हेलकावे खात होते, पडत होते. त्या दोघी त्या दोघांना आवरण्याचा, आधार देण्याचा  प्रयत्न करत होत्या. त्या दिवशी ही वेगळीच वटपौर्णिमा पाहिली मी. त्यांच्या ‘एकत्र’पणाचा छान आनंद वाटला पण काळजी वाटली की ही लोकं कुठल्या गावची असतील? घरी कधी आणि कसे पोहोचतील? यांना जेवायला कोण देईल? 

गाडीतल्या माझ्या सहका-यापैकी कुणीतरी म्हणालंच, ‘त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलंच नाही तर ते बदलतील कसे?’ ते ऐकलं आणि वाटलं, म्हणून आपलं काम महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून जगण्याचा रस्ता दाखवायला शिक्षण हा एकमेव निश्चित मार्ग आहे  हे आता अधिक पटू लागलं आहे. उद्या शहरी बायांचं पाहून, टीव्ही सिरिअल्समध्ये दाखवतात ते पाहून कदाचित माझ्या आदिवासी बायाही वडाला फे-या मारायला शिकतील, त्या फे-या  सुरू व्हायच्या आत त्यांची ओळख स्वत:च डोकं वापरणा-या सृजनशील सावित्रीबाई फुलेंशी करून दिली पाहिजे .

त्यासाठी तर इथं काम केलं पाहिजे.

(लेखिका जव्हारस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) 

sakhi@lokmat.com


Web Title: The womens are dangerous. They can adjust themselves to any conditions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.