अजित जोशी

‘स्वामीजी, तुम्ही जे म्हणालात त्यावर मी विचार करत होते’ - झुबिना म्हणाली. ‘एक विकणारा, समजा अशोक त्याचं नाव आणि एक विकत घेणारा समजा सचिन यांनी एकमेकांशी करार करायचा की भविष्यातल्या एका तारखेला, समजा १५ नोव्हेंबर आपण अमुक एका वस्तूची, समजा स्टील, काही एककं, समजा १०० किलो, अमुक एक भावाला, समजा २००० रुपये प्रतिकिलो खरेदी-विक्री करू. हेच डेरिव्हेटिव्ह झालं ना? ’
‘एकदम बरोबर समजलात तुम्ही’ - स्वामीजींनी हसून दाद दिली. ‘फक्त हे एक प्रकारचं डेरिव्हेटिव्ह आहे, इतरही आहेतच ना. या प्रकाराला म्हणतात, फॉरवर्ड’
‘आता १५ तारखेला भाव जर २००० हून जास्त असेल तर फायदा होईल सचिनचा आणि कमी असेल तर फायदा होईल अशोकचा, बरोबर?’
‘हेही बरोबर. पण फायदा-तोटा शब्द वापरताना आपण हे पाहायला पाहिजे, की या दोघांनी मुळात करार का केलाय?’
‘का केलाय म्हणजे?’
‘म्हणजे असं कीकाहीवेळा हा करार करतो, ते फक्त किमतींमधल्या चढ-उतारामुळे आपल्याला फटका बसू नये म्हणून. जसं की मी तुम्हाला गेल्या वेळेला स्कूटीचं उदाहरण दिलं होतं; पण काहीवेळेला हा करार होतो तो म्हणजे नेमक्या याच चढ-उतारापासून फायदा कमावायला. म्हणजे आता तुझ्या उदाहरणात, अशोकला वाटतंय की किमती उतरणार म्हणून तो भविष्यात विकतोय २००० ला. आता त्या उतरल्या की तो उतरलेल्या किमतीत खरेदी करून २००० ला विकेल आणि फायदा कमवेल.’
‘आणि सचिनला मात्र वाटतंय किंमत वर जाईल, त्यामुळे तो २००० ला खरेदी करून ठेवतोय, म्हणजे किंमत वर गेली की नफा कमावता येईल, बरोबर?’
‘परफेक्ट. याला म्हणतात आडाखेबाजी, म्हणजेच स्पेक्युलेशन.’
‘पण, यात एका बाजूला तोटा नक्की आहे आणि एकीकडे फायदा,’ - रमानं काळजीच्या सुरात विचारलं.
‘हो नं, म्हणूनच हे धोक्याचं आहे. आणि त्यात बरेचदा काय होतं, हे करणाºया लोकांचा आत्मविश्वास इतका जोरदार असतो की ते जवळ पैसे नसताना असा करार करतात. मोठ्या रकमेचा आणि अंदाज चुकला की मग त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ येते. म्हणजे समजा, सचिननं दहा हजार किलोला हा व्यवहार केला आणि त्याचा अंदाज चुकला. किंमत आली थेट १९०० वर, तर त्याला करार पाळायला खरेदी करायला लागेल २००० ने; पण तो विकू शकेल १९०० लाच. म्हणजे त्याचा एकूण तोटा होऊन जाईल दहा लाख रुपये.’ - स्वामीजींनी हिशेब दिला.
‘अर्रे बाप रे, म्हणजे एकदा करार केला की फसला म्हणायचं की’ - सविताचे डोळे मोठ्ठे झालेच नेहमीसारखे.
‘असं काही नाही. समजा ६ नोव्हेंबरला किंमत झाली १९८०, सचिनला वाटलं की अंदाज चुकतोय आणि त्याच वेळेला महेशला वाटतंय की किंमत १९९० तरी होईल, तेव्हा महेश-सचिन वेगळा करार करतील. सचिन त्याचा २० रुपयांचा तोटा मान्य करून ते पैसे महेशला देईल आणि आता मूळ करारात सचिनची जागा महेश घेईल.’
‘अर्रेच्च्या, म्हणजे मूळ करारावर किंमत आहे २००० ची, पण त्यातले २० महेशला आधीच आलेत, तेव्हा आता त्याला प्रत्यक्षातली किंमत पडते ती १९८०च,’ रमाचीही चक्र आता जोरात फिरत होती.’
‘पण काय हो, १५ नोव्हेंबरला समजा किंमत झाली २०५० तर, अशोकला ५० रुपयांचा तोटा आहे, नाही का?’ - उमाकाकू मैदानात उतरल्या.
‘बरोबर, कारण त्याने विकायची किंमत ठरवून टाकलीये २०००. पण खरेदी पडेल २०५० ला, म्हणजे ५० रुपये तोटा.’
‘मग समजा, तो म्हणाला की देत नाही पैसे, कोण महेश, आणि कोण सचिन, तर? अहो, १०० किलो गुणिले ५० रुपये, म्हणजे ५००० रुपयांचा तोटा फक्त. त्यासाठी कोर्टकचेरी करण्यात वेळ आणि पैसा किती जाईल?’ - हे सुचणार अर्थात काकूंनाच...!
‘तुमचा शंकेखोरपणा अगदी रास्त आहे काकू, अहो, आर्थिक व्यवहारात असंच शंकेखोर असायला हवं’, खुद्द स्वामीजींनी कधी नाही ती काकूंना दाद दिली.
‘पण म्हणूनच, हे व्यवहार सहसा समोरासमोर (ओव्हर द काउंटर ) करत नाहीत. त्यापेक्षा ते मार्केटच्या माध्यमातून करतात.’
‘मार्केटच्या?’
‘हो, उदा. मुंबई स्टॉक एक्सचेंज. हा फॉरवर्डचा व्यवहार जेव्हा मार्केटच्या माध्यमातून होतो, तेव्हा त्याला म्हणतात फ्युचर.’
‘पण नाव बदलून यात काय फरक पडणार?’
‘पडणार ना.
मार्केट एखाद्या वर्गातल्या मॉनिटरसारखा शिस्त लावतं व्यवहार करणाºया पार्टींना. पण ती कशी लावतं, ते आता आपण पुढच्या सत्संगात ऐकू..

(लेखक चार्टर्ड अकाउण्टण्ट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.