Neat And clean Fridge. This can be possible with some management skills. | नीट नेटका फ्रीज.. अवघड काय त्यात?
नीट नेटका फ्रीज.. अवघड काय त्यात?

-सायली राजाध्यक्ष

माझी एक मैत्रीण आणि मी बोलताना अनेकदा स्वयंपाकघराची स्वच्छता हा आमचा आवडीचा विषय असतो. अनेक लोक बाहेर इतके छान कपडे घालून आणि टापटीप असतात की आपल्याला असं वाटतं, की यांचं घर काय नीटनेटकं ठेवलेलं असेल! पण प्रत्यक्षात घरात गेल्यावर आपला हा भ्रम दूर होतो.

 कुठल्याही घरातला फ्रीज हा त्या घराच्या नीटनेटकेपणाचा निकष असतो असं मला वाटतं. 

अनेक घरांमध्ये फ्रीज उघडला की त्यातलं सामान बदाबदा अंगावर कोसळेल की काय असं वाटायला लागतं, इतकं ते खचाखच भरलेलं असतं. काही घरांमध्ये वर्षानुवर्षं फ्रीज साफच केलेले नसतात.  फ्रीज उघडला की कुबट वास यायला लागतो. अनेकांच्या फ्रीजमध्ये अन्नाची उघडी भांडी ठेवलेली असतात, सांडलेलं अन्न तसंच वाळलेलं असतं. कोरडे मसाले फ्रीजभर विखुरलेले असतात. असा फ्रीज बघितला की कसंतरी व्हायला लागतं. 

भारतासारख्या समशितोष्ण हवामानातल्या देशात भरपूर बॅक्टेरिया असतात. अशा देशात फ्रीज हा खरं तर अन्नाचा ताजेपणा टिकवण्यासाठी वापरायचा असतो. तो ताजेपणा टिकवायचा असेल तर अन्नाचं नीट नियोजन आणि व्यवस्था करायची असते. म्हणून आज मी फ्रीज नियोजनाबद्दल लिहिणार आहे.

हे करता येईल.

1) घरातला फ्रीज महिन्यातून एकदा बंद करा. तो पूर्ण रिकामा करा. नंतर तो साबणाच्या पाण्यानं स्वच्छ पुसा. मग साध्या पाण्यानं आणि मग अर्थातच कोरड्या फडक्यानं अगदी कोरडा करा. थोडावेळ उघडा ठेवा. मग त्यात सामान व्यवस्थित भरा. म्हणजे फ्रीजरमध्ये फ्रोजन गोष्टी (उदाहरणार्थ मटार, कॉर्न दाणे, घरी केलेलं लोणी इत्यादी) तसंच कोरड्या मसाल्यांची पाकिटं (आपण जी पावभाजी-सांबार यासह अनेक गोष्टींचे कोरडे मसाले वापरतो त्याप्रकारचे मसाले, जायफळपूड, वेलचीपूड, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर इत्यादी) तुम्ही ठेवू शकता. 

2) खाली फ्रीजमध्ये चिल ट्रेमध्ये बटर, चीज, शिवाय जे मसाले थोडे थोडे लागतात ते म्हणजे बडिशेपेची पूड, मोहरीची पूड, मीरपूड असं ठेवा. 

3) फ्रीजच्या पहिल्या कप्प्यात सगळे दुधाचे पदार्थ म्हणजे रोजचं दूध, दही, ताक, विरजण लावलेली साय इत्यादी ठेवा. त्याच्या खालच्या कप्प्यात रोजच्या स्वयंपाकातले उरलेले पदार्थ ठेवा. शिवाय काही फळं असतील तर तीही ठेवा (उदाहरणार्थ डाळिंब सोलून त्याचे दाणे किंवा स्ट्रॉबेरीज इत्यादी. पपई, केळी, चिकू ही फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत  कारण त्यांचा पोत बदलतो.) 

4) त्याच्या खालच्या कप्प्यात कोथिंबीर, आलं, मिरची, पुदिना, कढीपत्ता, लिंबं यांचे डबे, मोड आलेली कडधान्यं असतील तर ती, शिवाय निवडलेल्या पालेभाज्या, दुस-या दिवशी सकाळी करण्याच्या भाजीसाठी आवश्यक असेल तर चिरलेला  कांदा, टोमॅटो इत्यादी ठेवा. 

5) सगळ्यात खालच्या कप्प्यात दाणे कूट, धणे-जिरेपूड, सुकामेवा असेल तर तो, अख्खा खडा मसाला 
जास्त आणलेला असेल तर तो, ऑलिव्हज, स्वयंपाकासाठी लागणारे रेडिमेड सॉस वापरत असाल तर त्यांच्या बाटल्या असं ठेवता येईल. 

6) सगळ्यात खाली भाजीचा ट्रे. मी स्वत: आठवड्यातून दोनदा भाजी घेऊन येते. पालेभाज्या, कांदे-बटाटे वगळता सगळ्या भाज्या भरपूर पाण्यात थोडंसं पोटॅशिअम परमॅगनेट घालून धुते. त्या स्वच्छ पंचावर घालून अगदी कोरड्या करते आणि मग त्या फ्रीज बॅग्जमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवते. तसं करणं शक्य असेल तर तसं करा.

फ्रीज जर अशा पद्धतीनं लावलेला असेल तर मग तुम्हाला स्वयंपाक करताना त्रास होणार नाही.

स्वयंपाकाची बेगमी

माझ्या घरी फ्रीजमध्ये कायम दोन गड्डे लसूण सोललेला असतो. शिवाय महिन्यातून एकदा दाण्याचा कूट, तिळाचा कूट, धणेपूड, जिरेपूड, पिठीसाखर, थोडासा ताजा गरम मसाला, सांबार मसाला हे करून ठेवलं जातं. शिवाय बडिशेपेची पूड, मोहरीपूड, मीरपूड हे लागेल तसं करून ठेवते.
 

मी सुके मसाले विकत आणून वापरते. चिंच-गूळ-खजुराची चटणी महिन्यातून एकदा करून ती बाटल्यांमध्ये भरून फ्रीजरला ठेवलेली असते. खोवलेला नारळ लहान लहान काचेच्या कंटेनर्समध्ये फ्रीजरला ठेवलेला असतो. म्हणजे एकावेळेला एकच कंटेनर काढला की काम होतं. शिवाय चिंचेचा कोळ काढून तोही फ्रीजरला ठेवलेला असतो. फक्त तो आठवणीनं आधी बाहेर काढून ठेवावा लागतो इतकंच. 

अजून एक गोष्ट, मी प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करत नाही. फ्रीजमध्ये सर्व गोष्टी स्टील किंवा काचेच्या कंटेनर्समध्येच ठेवलेल्या असतात. पाण्याच्या बाटल्या स्टीलच्या वापरते. तुम्ही प्लॅस्टिकच्या वापरत असाल तर दरवर्षी त्या बदलण्याची खबरदारी घ्या.

नियमित साफसफाई

 फ्रीज महिन्यातून एकदा बंद करून वर सांगितल्याप्रमाणे स्वच्छ करा. पण फ्रीजचे शेल्फ रोज मऊ कपड्यानं पुसून घ्या. म्हणजे काही सांडलं असेल तर ते स्वच्छ होऊन जाईल.
 रोज फ्रीज नीट आवरा. उरलेले पदार्थ खायचेत की कुणाला द्यायचेत याचा नीट विचार करून त्याची व्यवस्था करा. फ्रीजमध्ये ठेवल्या जाणा-या सगळ्या भांड्यांवर झाकणं ठेवा. 
 भाज्यांच्या पिशव्या निदान दोन दिवसाला बघा. काही भाज्या लवकर खराब होतात त्यासाठी हे आवश्यक आहे. असं सगळं केलंत तर तुमचा फ्रीज तर चांगला राहीलच पण तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

खरं सांगायचं तर तुम्ही सगळेच जण थोड्या फार फरकानं हे करत असणारच. पण एकमेकांबरोबर शेअर केलं की एखादी गोष्ट पटकन लक्षात येते किंवा आवडून जाते किंवा अरे इतकी साधी सोपी गोष्ट आपला वेळ वाचवू शकते असाही साक्षात्कार होतो. यातल्या कित्येक गोष्टी मी वेगवेगळ्या लोकांच्या बघून, वाचून आणि अर्थातच इतकी वर्षं स्वयंपाकघरात वावरल्यानंतर आत्मसात केलेल्या आहेत.

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sakhi@lokmat.com


Web Title: Neat And clean Fridge. This can be possible with some management skills.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.