Gawda Saree | गावडा साडी
गावडा साडी

- मनस्विनी प्रभुणे-नायके
गोव्यातल्या सासष्टी तालुक्यातील गावांमध्ये कामानिमित्तानं फिरत होते. एका गावात पोहोचले तेव्हा दारात वृद्ध महिला बसलेली दिसली. गावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या वृद्ध महिलेपासूनच सुरुवात करावी म्हणून जवळ गेले, तर मला बघताच वृद्ध महिला उठून उभी राहिली. तोवर तिनं काय नेसलंय हे समजलं नव्हतं. तिची साडी नेसण्याची पद्धत खूपच वेगळी वाटली. मेघालयातील ‘खासी’ महिला ज्या पद्धतीनं एका खांद्यावर पदराच्या दोन्ही टोकांची गाठ मारतात तशी काहीशी ही साडी वाटली. याला ‘गावडा साडी’ म्हणतात असं बरोबर असलेल्या एकीकडून समजलं. गोव्यातील अन्य भागात अशी साडी नेसलेली कोणी बघितली नव्हती. या भागात गावडा समाजाची वस्ती होती. त्या वस्तीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याही महिला आता गावडा साडी नेसणाºया नव्हत्या. काम संपलं, त्या गावातून बाहेर पडले पण डोक्यात गावडा साडी घोळत होती. साडी तशी साधीसुधीच पण तरीही लक्षात राहिली.
प्रत्येक राज्याची आपापली वस्त्र परंपरा आहे. गोव्याच्या वस्त्र परंपरेचा शोध घेतला तर तो गावडा साडीपर्यंत येऊन थांबतो. पोर्तुगिजांमुळे गोमंतकीयांनी अन्य भारतीयांपेक्षा पाश्चिमात्य जीवनशैली खूप आधी अनुभवली. बहुतांशी गावडा समाजाचे पोर्तुगिजांच्या काळात धर्मांतर झाले. अन्य समाजाने आपल्या राहणीमानात, वेशभूषेत बदल केले; पण गावडा बायकांनी बदल केला नाही. या बायकांची ओळख बनून गेलेली गावडा साडी धर्मांतरानंतरही तशीच राहिली. खास गावडा समाजातील महिलांसाठी ही साडी तयार व्हायची. म्हणूनच त्या साडीला गावडा साडी असं नाव पडलं. गावडा हा आदिवासी समाजाचा घटक. शेतीच्या जोडीला काहीतरी छोटं-मोठं मोल-मजुरीचं काम करून खाऊन-पिऊन सुखी असणारा. तरीसुद्धा गोव्यातील अन्य समाजाच्या तुलनेनं मागास गणल्या जाणाºया या एकमेव समाजातील महिलांसाठी स्वतंत्र वस्त्रनिर्मिती होत होती हे विशेषच. शेतात लगबगीनं हालचाल करता यावी म्हणून गुडघ्यापर्यंत साडी नेसणं सोयीचं होतं. शिवाय या गावडा महिला बाजारात ओझी उचलण्याचं काम करायच्या. त्यांना भाडेली म्हणलं जायचं. अगदी अलीकडच्या काळातदेखील अशा भाडेली मडगावच्या बाजारात दिसायच्या. विशेषत: बाजारातून विकत घेतलेलं फर्निचर या बायका आपल्या पाठीवर लादून घरी पोहोचवायच्या. अशी ओझी घेऊन जाताना गुडघ्यांपर्यंत साडी नेसणं अधिक सोयीचं झालं असेल. या सगळ्याचाच विचार करून गावडा बायकांनी आपली गुडघ्यापर्यंत साडी नेसण्याची पद्धत सुरू केली असावी.
मातकट लाल रंग, काळपट लाल रंग आणि जांभळा फक्त एवढ्याच रंगात गावडा साडी बघायला मिळते. लाल रंग हा रक्ताशी तसेच इथल्या मातीशी नातं सांगणारा आहे. त्यामुळेच गावडा महिलांमध्ये लाल रंगाची साडी जास्त लोकप्रिय झाली असावी. गुडघ्यापर्यंत साडीच्या निºयांचा घोळ घेऊन पदरानं छाती झाकली जाईल अशा पद्धतीनं खांदे उघडे ठेवून साडी गुंडाळली जायची आणि त्याचं शेवटचं टोक डाव्या खांद्याच्या मागून पुढे घेत तिथे एक गाठ मारली जायची. साडी नेसण्याच्या या प्रकाराला ‘देंठली’ असं म्हणलं जातं. पूर्वी गावडा महिला या साडीवर ब्लाउज घालत नव्हत्या. पण १९४० साली पोर्तुगिजांनी कायदा करून, हुकूम काढून या साडीवर ब्लाउज घालणं सक्तीचं केलं. तरीसुद्धा सत्तरच्या दशकापर्यंत हा बदल घडून आला नव्हता. लाल रंगाची गावडा साडी, गळ्यात रेंगीबेरंगी मण्याच्या माळा आणि अंबाड्यात अबोलीच्या फुलांची वेणी माळली जाते तेव्हा सौंदर्यात अधिक भर पडते. हिरव्यागार निसर्गात या लाल रंगाच्या साड्या नेसलेल्या बायका म्हणजे निसर्गाला लाल रंगाचा टिळा लावल्यासारखंच.
गोव्यात या साड्या बनवण्याचं काम करणारी काही मोजकीच कुटुंबं होती. पण त्यांच्या हातमागांवर ज्या संख्येनं गावडा साड्या विणल्या जायच्या ते बघून या साडीला किती प्रचंड मागणी होती याची कल्पना येते. कांदोळीला रंगनाथ नरसिंह कामत यांच्या हातमागावर गावडा साड्या बनवायचा व्यवसाय होता. १९३३ साली त्यांच्याकडे १६ हातमागांवर गावडा साड्या बनवल्या जायच्या. पन्नास ते साठ प्रकारच्या गावडा साड्या ते बनवत असत. मडगावमध्ये त्याकाळी गोविंद सखाराम पै पाळंदीकर यांचं साडीचं दुकान होतं. गावडा साड्यांची विक्री त्यांच्या या दुकानांमधून व्हायची. रंगनाथ कामत यांचे चिरंजीव डॉ. राजीव कामत यांनी गावडा साडीबद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘मंगळूरमधून शेट्टीगर आडनावाची काही विणकरांची कुटुंबे गोव्यात आली आणि त्यांनी पहिल्यांदा ही साडी बनवायला सुरुवात केली. ही साडी गावडा समाजातील बायकांनी विकत घ्यायला सुरुवात केली. पण तेव्हा ही साडी फक्त पाचवारी होती. म्हणजे आताच्या सहावारी साड्यांहून लहान होती आणि कदाचित त्यामुळेही गावडा बायकांनी ही साडी गुडघ्यापर्यंतच नेसायला सुरुवात केली असावी. गावडा समाजातील तरुण मुली शिक्षणासाठी गावाबाहेर पडू लागल्या. नोकरी करू लागल्या. अशावेळी गावडा साडी नेसणं सोयीचं नव्हतं. त्यामुळेही या साड्यांची मागणी घटली असावी किंवा एका विशिष्ट वर्गातील महिला ही साडी नेसतात अशी गावडा साडीची ओळख त्यावेळी झाली होती म्हणूनच कदाचित अन्य वर्गातील महिलांनी त्याकाळी ही साडी नेसण्याचं धाडस केलं नसावं. परिणामी गावडा साडी तयार होणं बंद झालं.’
मागच्या वर्षी गावडा साडी परत एकदा प्रकाशझोतात आली. लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. विनायक खेडेकर आणि इतिहासाचे अभ्यासक डॉ. रोहित फळगावकर यांच्या प्रयत्नांनी गोव्यातील महिलांना पुन्हा गावडा साडी पाहण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळाली. गावडा साडीला राज्य वस्त्राचा दर्जा मिळावा म्हणून विनायक खेडेकर आणि रोहित फळगावकर हे दोघेही प्रयत्नशील आहे. गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात गावडा साडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लोकसंस्कृतीतील महत्त्वाचा मानला जाणारा ‘मांड’ हा प्रकार, ज्यात महिला गावडा साडी नेसून नृत्य करतात. तर या मांडला एकदा रोहित फळगावकर गेले होते आणि अर्ध्यातच महिलांचा नाच थांबला. थांबण्याचं कारण विचारलं असता त्या महिलांनी नेसलेल्या गावडा साड्या खूप जीर्ण झालेल्या असल्यामुळे कोणा एका महिलेची साडी फाटली. त्यामुळे तिला त्या नाचात सहभाग घेता येईना म्हणून अर्ध्यावरच नाच थांबवला होता. या घटनेनं डॉ. फळगावकर आणि विनायक खेडेकर यांनी गावडा साडीचा शोध घायला सुरुवात केली. गोव्यात नाही पण बेळगावात काही विणकर त्यांना सापडले. त्यांच्या या प्रयत्नातून गावडा साडी पुन्हा एकदा महिलांच्या अंगावर दिसू लागली. पण यावेळी खूप मोठा सामाजिक बदल झालेला जाणवला. गावडा साडी आता फक्त एका विशिष्ट वर्गाची राहिली नाही. जात-समाजाच्या भिंती तोडून आता सर्व समाजातील महिला मोठ्या अभिमानानं गावडा साडी नेसू लागल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडील रॉड्रिक्सनं तर गावडा साडीला रॅम्पवर नेऊन एक आकर्षक रूपदेखील दिलं. सध्याच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर चलती असणाºया साडी ग्रुपवरदेखील अनेकजणी गावडा साडी नेसून दिमाखदारपणे स्वत:ला छान मिरवतात. गावडा साडीचा पुनर्जन्मच होतोय जणू...

(लेखिका पणजीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)
 


Web Title: Gawda Saree
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.