चोरट्यांना पीएसआयने हटकले; दोघांकडून थेट गोळीबार, तळेगाव दाभाडेत घटनेने खळबळ

By नारायण बडगुजर | Published: May 9, 2024 08:15 PM2024-05-09T20:15:47+5:302024-05-09T20:19:48+5:30

चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना

Thieves busted by PSI Direct firing by two excitement over the incident in Talegaon Dabhade | चोरट्यांना पीएसआयने हटकले; दोघांकडून थेट गोळीबार, तळेगाव दाभाडेत घटनेने खळबळ

चोरट्यांना पीएसआयने हटकले; दोघांकडून थेट गोळीबार, तळेगाव दाभाडेत घटनेने खळबळ

पिंपरी : बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनापोलिस उपनिरीक्षकाने हटकले. त्यामुळे चोरट्यांनी गोळीबार करत धूम ठोकली. तळेगाव दाभाडे येथे पुणे-मुंबई महामार्गावरील लिंब फाट्याजवळील काॅलनीत गुरुवारी (दि. ९) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या याप्रकाराने खळबळ उडाली.

देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळील काॅलनीत पोलिस उपनिरीक्षक शाम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शाम शिंदे हे तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान, घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे काॅलनीत आले होते. त्यावेळी काॅलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित व्यक्ती आढळून आली. संशयिताने चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यामुळे उपनिरीक्षक शिंदे यांनी त्याला हटकले. ‘‘तू कोण आहेस, येथे कशासाठी आलास, कोणाकडे आलास, कोणाला भेटायचे आहे,’’ असे शिंदे यांनी संशयिताला विचारले. त्याचा राग येऊन संशयित व्यक्तीने त्यांना उर्मट उत्तरे दिली. ‘‘ए चल तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हू, असे संशयित व्यक्ती म्हणाला. त्यानंतरही उपनिरीक्षक शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी संशयिताने त्याच्या खिशातील पिस्तूल दाखवले. त्यामुळे शिंदे यांनी आरडाओरडा केला. ‘‘चोर आले चोर आले,’’ असे म्हणून शिंदे यांनी काॅलनीतील इतर लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला. भिंतीवरून उडी मारून तो आणि बाहेर थांबलेला त्याचा एक साथीदार असे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून पळून जात होते. त्याचवेळी काॅलनीतील काही जण तेथे आल्याने दुचाकीवरील संशयिताने त्याच्या पिस्तूलातून एक गोळी जमिनीवर झाडली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून भरधाव निघून गेले. 

घटनेबाबत उपनिरीक्षक शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त देविदास घेवारे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. 

कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश

चोरट्यांनी काॅलनीतील बंद बंगल्याच्या सेफ्टी डोअरचे कुलूप हेक्साने कापून तोडले. त्यानंतर कटावणीच्या साह्याने मुख्य दरवाजाचे लॅचलाॅक उचकटून बंगल्यात प्रवेश केला. मात्र, त्यांचा चोरीचा डाव उधळला.  

पोलिस उपनिरीक्षक शाम शिंदे यांची सतर्कता

आपल्या काॅलनीत कोणीतरी संशयित व्यक्ती आल्याचे पाहून शाम शिंदे यांनी त्याला हटकले. त्यामुळे चोरीचा प्रकार टळला. त्यामुळे शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांची पथके रवाना

चोरटे दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

Web Title: Thieves busted by PSI Direct firing by two excitement over the incident in Talegaon Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.