ठळक मुद्देवीणा आणि शीव या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली देत घराच्या बाहेर पडल्यानंतर ते लग्न करणार असल्याचे सांगितले. या प्रेमप्रकरणाला शीवच्या आईचा विरोध असल्याने बाहेर गेल्यानंतर घरातल्यांची प्रतिक्रिया काय असणार याची मला भीती वाटत असल्याचे शीवने कबूल केले.

बिग बॉस मराठी 2  ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले जवळ आला असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. शीव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे यांच्यामधील एकाला 1 सप्टेंबरला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात नुकतेच पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत सगळ्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी स्पर्धकांचा मुड खूपच चांगला होता. हा कार्यक्रम पाहात असताना हे घर आतून कसे आहे हे जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. आम्हा पत्रकारांसाठी या घरातील गार्डन परिसरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. गार्डन परिसरातील अडगळीच्या खोलीच्या समोर आणि स्विमिंग पूलच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे बसले होतो. आम्हाला पाहिल्यानंतर पहिल्यांदाच मास्क न घातलेली बाहेरची लोक आम्हाला पाहायला मिळत आहेत ही शीवची प्रतिक्रिया होती तर पत्रकारांना आम्हाला कित्येक दिवसानंतर भेटायला मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे किशोरी शहाणे यांनी सांगितले. किशोरी शहाणे यांचा आवाज बसला असल्याने त्यांना बोलायला खूपच त्रास होत होता. पण तरीही त्यांनी या घरातील त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगितले.

पत्रकार परिषदेत खरी चर्चा रंगली ती म्हणजे वीणा आणि शीव यांच्या नात्याची... वीणा आणि शीव हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळते. हे दोघे खरेच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत की या कार्यक्रमापुरता हे नाटक करत आहेत हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यावर वीणा आणि शीव या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली देत घराच्या बाहेर पडल्यानंतर ते लग्न करणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर या प्रेमप्रकरणाला शीवच्या आईचा विरोध असल्याने बाहेर गेल्यानंतर घरातल्यांची प्रतिक्रिया काय असणार याची मला भीती वाटत असल्याचे शीवने कबूल केले.

वीणा आणि शीव यांची केमिस्ट्री या पत्रकार परिषदेत देखील पाहायला मिळत होती. ते दोघे सतत एकमेकांच्या कानात काही ना कुजबूजत असल्याचे दिसून येत होते. या घरात असताना अनेक स्पर्धकांमध्ये प्रचंड भांडणं झाली आहेत. पण आता आपले हेवेदावे, भांडणं विसरून आयुष्यात पुढे जायचे असे प्रत्येकाने ठरवले आहे. शेवटच्या आठवड्यात या सगळ्यांमध्ये आता गट्टी जमणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. शिवानी आणि वीणा यांचे या घरात असताना कधीच पटत नाहीये हे आपल्याला पाहायला मिळले आहे. पण या घराच्या बाहेर गेल्यानंतर व्यवसायिक नाते जपणार असल्याचे त्या दोघींनी देखील सांगितले. एकमेकांच्या समोर आल्यानंतर तू कशी आहेस इतके तरी आम्ही एकमेकींना विचारू असे त्यांनी सांगितले.

आरोह वेलणकर प्रचंड बडबडा असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पत्रकार परिषदेत तर कोणालाही प्रश्न विचारला तरी आरोह आवर्जून उत्तर देताना दिसला. तसेच नेहा आणि शिवानी यांची फ्रेंडशिप देखील पाहायला मिळाली. दोघी एकमेकांच्या शेजारीच बसल्या होत्या आणि या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील अशीच मैत्री टिकून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवानीचा या कार्यक्रमातील कमबॅक हा चर्चेचा विषय बनला आहे. यावर देखील शिवानीने आपले मत मांडले. मी माझ्या आरोग्याच्या कारणामुळे घराच्या बाहेर पडले होते. माझी तब्येत बरी झाल्यावर मी याबाबत वाहिनीला कळवले. माझ्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला परत घेण्याचे ठरवले. मी घरात आल्यानंतर या घरातील सगळ्या सदस्यांनी मला प्रेमाने स्वीकारले. त्याचमुळे मला तिकिट टू फिनाले मिळाले असे शिवानीने सांगितले. 

या सगळ्या सदस्यांसोबत गप्पा मारल्यानंतर या कार्यक्रमाच्या फिनालेसाठी शुभेच्छा देत आम्ही या स्पर्धकांचा निरोप घेतला. स्पर्धक देखील जोपर्यंत गार्डन परिसर आणि हॉल याच्यातील पडदा पडत नाही तोपर्यंत सगळ्यांना निरोप देताना दिसले. 

Web Title: Bigg Boss Marathi 2: shiv thakare and veena jagtap told about there marriage plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.