ठळक मुद्देअभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्याची बातमी आली आणि खळबळ माजली. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा उर्फ श्वेता तिवारी दुस-यांदा घरगुती हिंसेचे बळी ठरलेली पाहून अनेकांना धक्का बसला. आता अभिनवची आई म्हणजेच श्वेताच्या सासूबाईने  या सर्व प्रकरणावर मीडियाशी बोलत आपल्या सूनेवर गंभीर आरोप केले आहेत.

ई-टाईम्सशी बोलताना अभिनवच्या आईने श्वेतावर आगपाखड केली. ‘माझा मुलगा आणि श्वेता तिवारी यांच्यात सगळे काही ठीक व्हावे, अशीच आमची इच्छा आहे. नातू रियांशच्या (अभिनव व श्वेता यांचा मुलगा) भविष्यासाठी आम्हाला असे वाटते. रियांश सध्या खूप लहान आहे. त्याच्यावर या गोष्टींचा वाईट परिणाम होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. माझ्या मुलाने त्याच्या दोन्ही मुलांसाठी (रियांश आणि सावत्र मुलगी पलक) खूप काही केले. त्याने काय काय केले, हे सगळे एकदिवस जगापुढे येईल. गेल्या दोन वर्षांपासून अभिनव व श्वेता यांच्या संसारात कुरबुरी सुरु आहेत. अभिनवने संसार सांभाळण्याचे खूप प्रयत्न केलेत. त्याला श्वेतासोबत राहायचे आहे. पण त्याचे प्रयत्न वाया गेलेत. पलक लहान होती, राजा चौधरीने (श्वेताचा पहिला पती) तिला सोडले तेव्हापासून अभिनव तिची काळजी घेतोय. तिचे अ‍ॅडमिशन त्यानेच केले. तिच्या प्रत्येक पॅरेंट मिटींगला तो गेला. श्वेता बिग बॉसच्या घरात होती तेव्हाही त्याने पलकची काळजी घेतली. पण हे सगळे काही विसरून ती  माझ्या मुलावर घाणेरडे आरोप करत आहे. श्वेताला माझ्या मुलापासून सुटका हवी आहे. ती अभिनवला घटस्फोट देऊ इच्छिते, म्हणून ती हे सगळे करतेय. यापेक्षा अधिक मी काहीही बोलणार नाही,’ असे अभिनवच्या आईने म्हटले.

श्वेता याआधीही ठरलीय घरगुती हिंसाचाराची बळी
श्वेताने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच  राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी श्वेता केवळ 19 वर्षांची होती. राजाने देखील काही चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. नच बलिये या कार्यक्रमात देखील ते दोघे एकत्र झळकले होते.


पण लग्नानंतर काहीच वर्षांत राजा आणि प्रेरणामध्ये सतत भांडणं होत होती. दारूच्या नशेत राजाने अनेकवेळा श्वेतावर हात उगारला होता. राजा मारहाण करतो, तसेच त्याने त्यांची मुलगी पलकला पळवण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला असे अनेक आरोप श्वेताने त्यावेळी केले होते. श्वेताने हे सगळे नऊ वर्षं सहन केले आणि नंतर या सगळ्या गोष्टींना कंटाळून 2007 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पलकचा सांभाळ श्वेता करत आहे. श्वेता आणि राजा यांचा प्रेमविवाह होता. राजाशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असे श्वेताने बिग बॉसच्या घरात असताना सांगितले होते. 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. या दोघांना रियांश नावाचा एक मुलगाही आहे.

Web Title: after shweta tiwaris allegation of domestic abuse now abhinav kohlis mother comes to rescue her son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.