वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:42 IST2019-04-09T15:43:43+5:302019-04-09T16:42:03+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर याचा प्रचार शिगेला

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग
राकेश कदम
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर आणि पुत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात तळ ठोकला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या अनुपस्थितीत प्रचाराचा किल्ला लढवित आहेत.
आंबेडकर हे आघाडीचे प्रमुख स्टार प्रचारक आहेत. सोलापुरातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते चार दिवस सोलापुरात होते. आता ते राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या प्रचार सभांना हजेरी लावत आहेत.
प्रकाश आंबेडकरांसाठी जिल्ह्यातील आंबेडकरी विचारांचे सर्व गट एकत्र आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारी नेतेही एकत्र फिरत आहेत. शिवाय मुस्लिम आणि धनगर समाजातील काही नेतेही त्यांच्यासोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे हे नेते सांगत आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांना एकसंघ ठेवण्याचे काम आंबेडकर कुटुंबातील सदस्य करीत आहेत.
अॅड. प्रकाश आंबेडकर । व्हीबीए
अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले अॅड. प्रकाश आंबेडकर यंदा अकोल्यासह सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत. सोलापुरातून निवडणूक लढविण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे.
बंधू । आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनासह विविध सामाजिक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. एक एप्रिलपासून ते सोलापूर मुक्कामी आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर ग्रामीण भागातील प्रचाराची जबाबदारी दिली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागात त्यांनी बैठक घेतल्या आहेत.
मुलगा । सुजात आंबेडकर
ुसुजात आंबेडकर गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक आंदोलनामध्ये सक्रिय आहेत़ अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ते सोलापुरात आले होते. त्यांनी शहरातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या असून ग्रामीण आणि शहर भागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आता शहरातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे.