Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:41 IST2026-01-05T18:36:40+5:302026-01-05T18:41:29+5:30
प्रचार रंगेल, तशी ही कुस्ती लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे

Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच
सांगली : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांची महापालिका निवडणुकीतील भूमिका मात्र सोयीचीच ठरली आहे. मुंबईत दोस्ती करताना सांगलीत मात्र प्रेमाची कुस्ती रंगली आहे. ही प्रेमाची कुस्ती काही ठिकाणी जोरदार संघर्षाची ठरली आहे.
महापालिका निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंड केलेल्या कार्यकर्त्यांना थंड करण्यात भाजपला पूर्ण यश आलेले नाही. नाराज इच्छुकांनी शिंदेसेना, राष्ट्रवादी पक्षाचे एबी फॉर्म मिळवत बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे पक्षाला स्वकियांसोबतच महायुतीच्या घटक पक्षांच्या उमेदवारांचाही सामना करावा लागणार आहे. राज्याच्या सत्तेत भाजपसोबत राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना व अन्य काही पक्ष आहेत. महापालिका निवडणुकीत मात्र ही दोस्ती फुटली असून, सारे पक्ष कुस्तीच्या मैदानात परस्परविरोधात आहेत.
स्थानिक गरज आणि सोयीनुसार युती करण्याची किंवा स्वतंत्र लढण्याची घोषणा या पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत केली होती. पण युती करण्यात ते अपयशी ठरले, त्यामुळे महापालिकेच्या रणमैदानात कुस्ती रंगली आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्या तुलनेत महायुतीचा तिसरा घटक पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ या आक्रमक भूमिकेत होता. पक्षाने शेवटपर्यंत युती किंवा आघाडीसाठी प्रयत्न न करता स्वतंत्र लढण्याचे धोरण काय ठेवले. अनेक प्रभागात हे तीनही पक्ष आमनेसामने आहेत.
अर्थात, काही प्रभागांत अजित पवार गट आणि भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ असल्याचीही चर्चा आहे. तर काही ठिकाणी अजित पवार गटाची काँग्रेससोबत दोस्तीत कुस्ती असल्याचे बोलले जाते. फक्त ३३ जागांवर उमेदवार उभे केलेल्या अजित पवार गटाने उर्वरित ४५ जागा जणू मित्रपक्षांसाठीच सोडल्या आहेत. या जागांवर फक्त दोस्तीच दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार रंगेल, तशी ही कुस्ती लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेतले आहे, त्याच धर्तीवर अजित पवार गटानेही भाजपच्या काहींना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे या पक्षांत निवडणुकीपूर्वीच कुस्ती सुरू झाली होती. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना ही कुस्ती रंगात आली आहे.
चिन्ह पोहोचविण्याचे धोरण
महापालिकेत स्वतंत्र लढण्यामागे अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचेही धोरण आहे. पक्षसंघटन मजबूत करणे आणि त्याद्वारे भविष्यातील अन्य निवडणुका स्वतंत्र लढविणे, हादेखील हेतू दिसत आहे.
होय, मुंबईत दोस्तीच
मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वत:च सांगलीत बोलताना महायुतीतील दोस्तीवर शिक्कामोर्तब केले. `सांगलीत किंवा अन्यत्र मित्रपक्ष भाजपसोबत लढाई असली तरी मुंबईत मात्र आम्ही एकच आहोत,` असा त्यांचा सूर होता. `मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी रात्री झाला असून, मुंबईचा महापौर युतीचाच होईल,` असा दावा त्यांनी केला.