Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:54 IST2025-11-15T11:51:53+5:302025-11-15T11:54:41+5:30
आरक्षणाने बिघडले गणित; तिकीटासाठी इच्छुकांची झुंबड

Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात
शीतल पाटील
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहराचे राजकारण तापले आहे. काही प्रभाग राखीव झाल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांची समीकरणे कोलमडली आहेत, तर नव्या चेहऱ्यांसाठी संधी खुली झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारीसाठी नेत्यांच्या कार्यालयात गर्दी केली आहे. इच्छुकांना पहिल्यांदा उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यानंतर मग प्रभागातील विरोधकांशी सामना होणार आहे. त्यात महायुतीत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांत मोठी रस्सीखेच आहे. त्यामुळे भाजप - युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. काही इच्छुकांनी शेजारच्या वाॅर्डात चाचपणी सुरू केली आहे, तर राखीव जागांवर घरातील महिला उमेदवार देण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. महायुतीतील भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. एका प्रभागात तीन ते पाच दावेदारांनी जोर लावला आहे.
भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात अंतर्गत उमेदवारी, जागा वाटपावरून रस्सीखेच होणार आहे. तिकीट कोणाला मिळणार, यावरून गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. सध्या इच्छुकांनी मिशन उमेदवारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी नेत्यांचे घर, कार्यालयातील चकरा वाढल्या आहेत. कार्यालयातही गर्दी दिसत आहे. प्रभागात चार सदस्यीय पॅनलमधील इतर उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सह्याद्रीनगर, खणभाग, गर्व्हमेंट काॅलनी, चांदणी चौक, शामरावनगर, गावभाग यासह अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाची मिळणार, याचीच चर्चा आहे.
गेल्या सहा महिन्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यात पाच - दहा वर्षापासून भाजपासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता भाजप नेत्यांना घ्यावी लागेल. त्यामुळे उमेदवारी वाटपात खऱ्या अर्थाने भाजप नेत्यांची कसरत होणार, हे निश्चित.
महाआघाडीत अजूनही शांतता आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणूक लढविण्यावर एकमत झाले आहे. पण, सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. या निवडणुकांनंतरच महाआघाडीचे नेते महापालिका निवडणुकीत लक्ष घालतील, असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. महाआघाडीतही अनेक प्रभागात एकाच जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांना उमेदवारी वाटपावेळी रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
पुढील आठवड्यात पक्षांतर्गत चर्चेला वेग
दोन्ही आघाड्यांत सध्या "पहिली लढाई पक्षात, दुसरी विरोधकांशी" अशी स्थिती आहे. तिकीट मिळवण्यासाठी काही जण नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत, तर काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा दाखवत दबाव तंत्र वापरत आहेत. आगामी आठवड्यात पक्षांतर्गत चर्चांना वेग येणार असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. तिकिटाच्या या लढाईत कोण बाजी मारतो, कोण बाहेर पडतो, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.