लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीत २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 06:35 PM2024-04-30T18:35:25+5:302024-04-30T18:36:11+5:30

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस दल सज्ज

During the Lok Sabha elections more than 20 crore worth of goods were seized in Sangli | लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीत २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

संग्रहित छाया

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा पोलिस दलाने ३२०५ लिटर दारू, २८ किलो गांजा, ४०७४ किलो गुटखा, १९ किलो व्हेल माशाची उलटी, असा २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी बजावली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

अधीक्षक घुगे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन केले जावे, यासाठी पोलिस दल सज्ज आहे. आतापर्यंत शस्त्र परवानाधारक २,४७४ पैकी २,१२३ जणांकडील शस्त्रे जमा केली आहेत. २४५ जणांना सवलत दिली असून, अद्याप १०२ शस्त्रे जमा करणे बाकी आहे. जिल्ह्यात ९ आंतरराज्य आणि १६ आंतरजिल्हा तपासणी नाके आहेत. या नाक्यावरून दारू, अमली पदार्थ, रोकड याची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

अधीक्षक घुगे म्हणाले, आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात २२५४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ३६ गुन्हेगारांना हद्दपार केले. विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या २३ जणांना अटक केली. तपासणी नाक्यांवर २० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त केला. अवैध धंद्यावर छापेमारी, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाबे, बार सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे.

बीट मार्शल, गस्ती पथके, भरारी पथके दक्ष ठेवण्यात आली आहेत. प्रचार काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रचारामध्ये पोलिस बंदोबस्त, रहदारीस अडथळा होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. व्हीआयपी बंदोबस्तात सीसीटीव्ही, व्हिडीओ शूटिंग, ड्रोन कॅमेरे तैनात केले जातात. आरसीबी, क्यूआरटी पथक, भरारी पथक सज्ज असून आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

सोशल मीडियावर लक्ष

आक्षेपार्ह व्हिडीओ, पाेस्ट व्हायरल होणार नाहीत, यासाठी सायबर सेल कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवले आहे. सी-व्हिजिल ॲपवर नागरिकांना तक्रार करता येते.

मतदान केंद्रांवर बंदोबस्त

जिल्ह्यात २,४४८ मतदान केंद्रे आहेत. केंद्रांवर तसेच शंभर मीटर परिसरात स्वतंत्र बंदोबस्त राहणार आहे. पोलिस दलासह केंद्र व राज्य राखीव दल, होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे.

मतदानाचा हक्क बजवावा

निवडणूक काळात अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावा, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले.

Web Title: During the Lok Sabha elections more than 20 crore worth of goods were seized in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.