Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > International Family Day 2026 : कुटुंबात होणाऱ्या मानसिक शारीरिक छळानं हैराण, पळून तरी कुठं जाणार?

International Family Day 2026 : कुटुंबात होणाऱ्या मानसिक शारीरिक छळानं हैराण, पळून तरी कुठं जाणार?

International Family Day 2026 :  १५ मे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस : नात्यातले काच आणि गुंते सुटतील कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 15:28 IST2026-05-13T15:28:04+5:302026-05-13T15:28:51+5:30

International Family Day 2026 :  १५ मे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस : नात्यातले काच आणि गुंते सुटतील कसे?

International Family Day 2026: how to handle mental and physical abuse in the family, where will you run away? | International Family Day 2026 : कुटुंबात होणाऱ्या मानसिक शारीरिक छळानं हैराण, पळून तरी कुठं जाणार?

International Family Day 2026 : कुटुंबात होणाऱ्या मानसिक शारीरिक छळानं हैराण, पळून तरी कुठं जाणार?

Highlightsमुलांच्या उत्तम विकासासाठी, वाढीसाठी त्यांना आधार देणारं, वाढीला पोषक ठरणारं वातावरण घरात असणं अत्यंत आवश्यक आहे.

नितांत महाजन

‘डे’ महात्म्य हल्ली तसं कमी झालं आहे. म्हणजे पूर्वी एखाद्या दिवसाला प्रचंड विरोध व्हायचा किंवा प्रचंड समर्थन तरी असे. आता ते सारं मागे पडून फार तर सोशल मीडियात स्टेटस ठेवणं किंवा रील करणं एवढाच काय तो दिनविशेष उपचार पार पडतो. तसा एक दिवस या आठवड्यातही आहे, १५ तारखेला. तो दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. फॅमिली... परिवार-कुटुंब यांचं महत्त्व काही कुणी कुणाला सांगायला नको. अगदी बडजात्या फिल्म्समध्ये पूर्वी दाखवत तितके प्रेमळ साजिरेगोजिरे नसले, तरी आपले कुटुंब असते आणि तसे ते ही आपल्या पाठीशी उभेच असते. साथ देते. सुख-दु:खात सोबत असते आणि आजकाल तर फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप सतत वाजतगाजत असतो. लेकरांचं कौतुक ते राजकीय वाद सगळेच तिथे चर्चेला येते. अगदी लांबलांबच्या नातेवाइकांचाही नव्या तंत्रज्ञानामुळे परस्परांशी संपर्क असतो आणि कुणाच्या घरी कुठं काय शिजलं हेही कळावं इतका सोशल मीडिया कनेक्ट असतो.

 

घरोघरी कुटुंबात कलह का?

अगदी आई-बाबा, दोन मुलं या घरातही तरुण मुलं आणि पालक यांच्यात वादळी वारे जोरदार वाहत असतात, ते कसे? घरातलं वातावरण अशांत असणं आणि त्यामुळे मनात सतत अस्वस्थता असणं हा प्रश्न तसा कॉमनच आहेच. घरातल्या एका कोणाची तरी कायम चिडचिड होणं किंवा त्यानं/तिनं संताप, आदळआपट करत घर डोक्यावर घेणं, हेही चित्र आपल्याकडे अनेक घरांत दिसतं. त्यापायी बाकी सदस्यांना घरात राहणं नकोसं वाटतं आणि ते जास्त वेळ बाहेरच राहणं निवडतात.
गैरसमज, चिडचिड, एकमेकांवर ओरडणं, एकमेकांशी संवादच नसणं, एक दुसऱ्याला घालूनपाडून बोलणं अनेक घरात इतकं वाढतं की, जणू ते एकमेकांचे वैरीच आहेत. कटकट नको असं वाटून कुटुंबातले काही सदस्य सतत आदळआपट करणाऱ्या माणसाच्या मनासारखं करतात, पण तरी तो मात्र ताठ्यात, दोषारोप आणि चुका काढणं सुरूच राहतं.
घरातली बाकीची माणसं म्हणतात तुझ्या मनासारखं करू, पण जरा शांत राहा. घरातलं वातावरण आनंदी राहू दे घर डोक्यावर घेऊ नको.
अर्थात तरी कायम मनावर दडपणच की, कधी याचा स्फोट होईल आणि सारं बिघडून जाईल...


अशा घरात कधी कुणी आनंदी नसतं. अनेकदा वडील अशा कंट्रोलिंग भूमिकांत जास्त दिसतात. सारं घर आपल्या आततायी वागण्यामुळे वेठीस धरतात. त्याहून वाईट हे की त्यांचेही वडील, काका तसेच वागत असतात आणि तापट असणं म्हणजे घरातले ऐकतात, असा समज त्यांनी लहानपणापासून करून घेतलेला असतो.
हे कमीच म्हणून आता दुसरा प्रकार आहे, तो घरातल्या तरुण आणि टीनएजर मुलांचा. ते मुडी होतात. घरकाम न करता फक्त हुकूम सोडत सगळं घरदार आपल्या तालावर नाचवतात.
काही घरांत आजी-आजोबा आपला हेका सोडत नाहीत.
म्हणायला रक्ताची नाती आणि प्रेमाची नाती, पण घरातच अनेकदा माणसं टॉर्चर होतात. प्रेम पुरेसं न मिळाल्यानं बाहेर आधार शोधतात किंवा मन मारून जगतात आणि जन्मभर मनात ठसठसती वेदना घेऊन जगतात.
घरातलं वातावरण आनंदी आणि पोषक असणं ही खरंतर प्रत्येकाची गरज आहे.
घरातल्या प्रत्येकानं आपल्यामुळे दुसऱ्याचा आनंद मिळेल, आधार वाटेल हे समजून वागण्याचीच गरज आहे.

 

उपाय कसे शोधता येतील?

१. न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी शांतपणे प्रेमानं सांगू. मुळात घरातली माणसं आपले वैरी किंवा गुलाम नाही, तर जिवाभावाची माणसं आहेत, हे समजून घेऊ.
२. घरातल्या कुठल्याच माणसांना हुकूम ठोकणं, त्यांनी आपलं म्हणणं ऐकलंच पाहिजे हा हेका सोडून देऊ.
३. आपलं म्हणणं ऐकलं जात नसेल, तर सांगून वाट पाहू, ज्याचं त्याला कळू देऊ. विशेषत: तरुण मुलांचं ऐकून समजून घेऊ. त्यांच्याही मताचा आदर करू.
४. आपणही इतरांचं ऐकू कारण आपलं ऐकलं जावं, समोरच्याला पटावं असं घरात प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे कधीतरी आपला हेका बाजूला ठेवून घरातल्यांचंही ऐकायला हवंच.
५. एकमेकांशी नीट संवाद साधता येणं, बोलात येणं हे कौशल्य आहे. ते शिकून घेऊ. आपण बाहेरच्या माणसांशी किती जमवून घेतो, मग घरातल्यांशी जमवून घेता येऊ शकतं.
६. कुटुंब ही आपली ताकद आहे, हे जर मान्य केलं आणि आपल्या माणसांशी प्रेमानंच वागायचं ठरवलं, तर अवघड गुंते सुटू शकतात.
७. अर्थात डोमेस्टिक व्हायलन्स, मारझोड, मानसिक छळ, मुलांचा छळ यासाठी कायदेशीर मदत मागणं चूक नाही. मात्र, सर्वसाधारण घरात होणारे रोजचे लहानसहान वाद, तंटे हे मात्र सोडवायचा प्रयत्न समजुतीनेच करायला हवा.
८. मुलांच्या उत्तम विकासासाठी, वाढीसाठी त्यांना आधार देणारं, वाढीला पोषक ठरणारं वातावरण घरात असणं अत्यंत आवश्यक आहे.

Web Title : अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस: पारिवारिक दुर्व्यवहार में फंसे, कहाँ भागें?

Web Summary : परिवार दिवस घरेलू कलह को उजागर करता है। गलतफहमी, संवाद की कमी और नियंत्रणकारी व्यवहार से संघर्ष उत्पन्न होते हैं। खुले संचार, आपसी सम्मान और जरूरत पड़ने पर मदद मांगने से स्वस्थ पारिवारिक गतिशीलता के लिए सहायक वातावरण बनाना महत्वपूर्ण है।

Web Title : International Family Day: Trapped in family abuse, where to escape?

Web Summary : Family Day highlights rising domestic discord. Conflicts arise from misunderstandings, lack of communication, and controlling behavior. Creating a supportive environment through open communication, mutual respect, and seeking help when needed are crucial for healthy family dynamics.