सध्या सोशल मीडियावर, रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींच्या गप्पांमध्ये रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग हे शब्द खूप ऐकायला मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातल्या चांगल्या किंवा धोक्याच्या संकेतांसाठी हे शब्द वापरले जातात. विशेषतः प्रेमसंबंध, मैत्री किंवा लग्नाच्या नात्यांमध्ये हे संकेत ओळखणं खूप महत्त्वाचं मानलं जातं.(Red Or Green Flag? knowing this is important for a relationship to last) पूर्वी नात्यांमध्ये अनेक गोष्टी दुर्लक्षित केल्या जायच्या, पण आता लोक मानसिक आरोग्य, आदर आणि भावनिक सुरक्षिततेला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळेच रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग या संकल्पना ट्रेंडमध्ये आल्या आहेत.
रेड फ्लॅग म्हणजे काय?
रेड फ्लॅग म्हणजे नात्यात दिसणारे असे काही संकेत जे पुढे जाऊन त्रासदायक किंवा विषारी ठरू शकतात. म्हणजेच समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातल्या अशा गोष्टी ज्या सावध राहण्याचा इशारा देतात. बोलण्याची पद्धत , वागणूक अनेक पैलू असतात. ज्या तुम्हाला त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा संकेत देत असतात.
उदाहरणार्थ सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं, प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं, राग आल्यावर अपमानास्पद बोलणं, तुमच्या भावना दुर्लक्षित करणं किंवा सतत खोटं बोलणं हे फार कॉमन रेड फ्लॅग मानले जातात. सुरुवातीला या गोष्टी छोट्या वाटू शकतात, पण वेळेनुसार त्याचा मानसिक त्रास होतोच.
ग्रीन फ्लॅग म्हणजे काय?
ग्रीन फ्लॅग म्हणजे नात्यासाठी सकारात्मक आणि निरोगी संकेत. अशा व्यक्तीसोबत तुम्हाला सुरक्षित, शांत आणि आदर मिळाल्यासारखं वाटतं. समोरची व्यक्ती तुमचं ऐकून घेते, तुमच्या भावना समजून घेते, तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देते आणि नात्यात प्रामाणिकपणा ठेवते, तर ते ग्रीन फ्लॅग मानलं जातं. ग्रीन फ्लॅग असलेली नाती मोकळी, विश्वासपूर्ण आणि आरामदायी वाटतात. अशा नात्यांमध्ये सतत भीती, ताण किंवा स्वतःला बदलण्याचा दबाव नसतो.
हे ओळखणं इतकं महत्त्वाचं का?
अनेकदा लोक प्रेम, सवय किंवा भावनिक गुंतवणुकीमुळे काही चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण रेड फ्लॅग वेळेवर ओळखले नाहीत तर पुढे जाऊन नातं मानसिकदृष्ट्या त्रासदायक होऊ शकतं. दुसरीकडे ग्रीन फ्लॅग ओळखल्याने निरोगी आणि आनंदी नातं टिकवणं सोपं होतं. नव्या पिढीची थेरं वगैरे असं बरंच काही या ,संकल्पनेला म्हटले जात आहे. पण आपल्यासाठी जीवनसाथी निवडताना या गोष्टींना विचार करणे गरजेचे नाही का ?
एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्ती परफेक्ट नसते. छोट्या चुका आणि रेड फ्लॅग यात फरक असतो. एखादी व्यक्ती कधी चुकू शकते, पण सतत दुखावणारं किंवा नियंत्रित करणारं वागणं हे गंभीरपणे घेणं गरजेचं असतं. सोशल मीडियामुळे या संकल्पना लोकप्रिय झाल्या असल्या तरी त्यामागचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही नात्यात फक्त प्रेम पुरेसं नसतं. आदर, संवाद, विश्वास आणि मानसिक सुरक्षितता देखील तितकीच आवश्यक असते. त्यामुळे नात्यातील रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग समजून घेणं म्हणजे स्वतःच्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्यासारखंच आहे.
