Dreaming Facts : झोपेत चांगली किंवा वाईट स्वप्नं येणं हा मानवी जीवनाचा महत्वाचा भाग आहेत. रोज आपल्याला काहीना काही स्वप्नं पडतात. सामान्यपणे आपल्याला हेच माहीत आहे की, स्वप्नं रात्री झोपेतच पडतात. म्हणजे स्वप्नांच्या दुनियेचा रस्ता फक्त गाढ झोपेतूनच जातो. म्हणजेच आपण स्वप्नं फक्त झोपेत असतानाच पाहतो. मात्र नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनातून हा जुना समज पूर्णपणे बदलून खोडून काढलाय.
संशोधकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे की, माणूस जागेपणीसुद्धा अगदी स्वप्नांसारखा अनुभव घेऊ शकतो. ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शनसारखं वाटत असलं, तरी यामागे आपल्या मेंदूचाच खेळ असल्याचं वैज्ञानिक सांगतात. चला तर मग, या रंजक शोधाबद्दल जाणून घेऊया.
झोप आणि जागेपणातील धूसर सीमा
वैज्ञानिकांच्या मते, आपल्या मेंदूचं कार्य इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याच्या काही अवस्था झोप आणि जागेपणाच्या चौकटीत बसत नाहीत. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि Paris Brain Institute शी संबंधित संशोधक निकोलस डेकेट यांच्या मते, स्वप्नांशी संबंधित मानसिक अवस्था फक्त झोपेतच नव्हे तर जागेपणीही तितक्याच प्रभावी असू शकतात. याचा अर्थ असा की, आपण पूर्ण शुद्धीत असतानाही आपला मेंदू काही क्षणांसाठी स्वप्नवत मानसिक अवस्थेत जाऊ शकतो.
92 लोकांवर करण्यात आलं संशोधन
या रहस्याचा उलगडा करण्यासाठी वैज्ञानिकांनी 92 अशा लोकांची निवड केली ज्यांना दिवसा डुलकी घेण्याची सवय होती. प्रयोगादरम्यान त्यांच्या मेंदूतील हालचालींचं निरीक्षण करण्यासाठी ईईजी कॅपचा वापर करण्यात आला. ही कॅप मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म हालचाली आणि सिग्नल्सची नोंद ठेवते, ज्यामुळे संशोधकांना मेंदूची कार्यपद्धती अधिक बारकाईने समजून घेता आली.
मेंदूच्या 4 वेगळ्या अवस्था
या संशोधनात वैज्ञानिकांनी मेंदूच्या हालचालींच्या आधारे 4 वेगळ्या मानसिक अवस्थांची ओळख पटवली. या अवस्था झोप आणि जागेपणामधील धूसर सीमारेषा स्पष्ट करण्यास मदत करतात. यातून असे दिसून आले की, स्वप्न पाहणे ही केवळ झोपेत सुरू होणारी शारीरिक प्रक्रिया नसून ती मेंदूची एक मानसिक अवस्था आहे, जी कोणत्याही वेळी सक्रिय होऊ शकते.
