कानात मळ साचणं हे खूपच सामान्य आहे. पण जर कानांमध्ये मळ वारंवार साचत असेल तर तो बाहेर कसा काढावा असा प्रश्न प्रत्येकालाच असतो. कानात साचलेला मळ बाहेर काढण्यासाठी बरेच लोक कानात तेल घालतात किंवा माचिसची काडी घालतात. कानातील मळ बाहेर काढण्यासाठी तुम्ही इअरबड किंवा टोकदार वस्तूंचा वापर केल्यामुळे कानांचं नुकसान होऊ शकतं. (How To Remove Ear Wax Naturally Doctors Advice)
कानातला मळ कसा बाहेर काढायचा
ईएनटी स्पेशालिस्ट डॉक्टर दिव्या यांनी कानातील मळ काढण्यासाठी काही सुरक्षित उपाय सांगितले आहेत. डॉक्टर सांगतात की जेव्हा कानात इअरवॅक्स जमा होतं तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. कानांमध्ये वेदना जाणवतात आणि कमी ऐकू येतं.
घरच्याघरी कान कसे स्वच्छ करावेत?
डॉक्टर सांगतात की कानात कोणतीही लहान मोठी वस्तू घालू नये. कान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इयरबड्स क्यू टिप्स, बॉबी पिन, हेअर क्लिप किंवा माचिसची काडी अशा वस्तूंचा वापर केला तर कानांचं नुकसान होऊ शकतं.
कानात मळ जमा झाल्यास तुम्ही मेडीकल स्टोअरवर मिळणारे इअरवॅक्स सॉफ्टनर ड्रॉप्स वापरू शकता. आठवड्यातून एकदा हे ड्रॉप्स कानात घाला. नंतर ईएनटी डॉक्टरांकडे जाऊन सुरक्षित पद्धतीनं इअर वॅक्स काढून घ्या.
ईएनटी डॉक्टर कानांची मायक्रोस्कोप, एंडोस्कोप किंवा ऑटोस्टोपनं तपासणी करतात. त्यानंतर हे वॅक्स क्युरेट, सिरिंजिंगच्या मदतीनं सुरक्षितरित्या बाहेर काढू शकतात.
घरगुती उपायांनीही कानांचे ब्लॉकेज बरे होत नसतील कानांमध्ये वेदना होत असतील तर ईएनटी डॉक्टरांना नक्की दाखवा. वर्षातून एकदा कान, नाक आणि गळ्याची तपासणी करा.
कानांची काळजी अशी घ्या.
तर तुम्ही हेडफोन्स वापरत असाल तर ६०-६० हा नियम पाळा. म्हणजेच आवाजाची पातळी ६० टक्के पेक्षा जास्त नसावी आणि दिवसातून ६० मिनिटांपेक्षा जास्तवेळ वापरू नका.
डीजे, फटाके किंवा कारखान्यातील मोठ्या आवाजाच्या ठिकाणी इअरप्लग्सचा वापर करा. अंघोळ केल्यानंतर किंवा पोहून झाल्यावर कान मऊ टॉवेलनं व्यवस्थित कोरडे करा. कानात पाणी राहिल्यास फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.पोहताना स्विमिंग कॅप किवा इअरप्लग वापरावेत.
कानात गरम तेल किंवा कोणतेही घरगुती द्रव पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घालू नका. यामुळे संसर्ग वाढू शकतो. कानातील मेण खरं तर धुळीपासून कानांचे रक्षण करण्यासाठी असते. जबड्यांच्या हालचालींमुळे ते आपोआप बाहेर येते. काही औषधांचे दुष्परिणाम कानांवर होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.
