काम करताना, मोबाइल पाहताना, मालिका बघताना किंवा गप्पा मारताना अनेकांना सतत काहीतरी खाण्याची सवय असते. थोडे चिप्स, थोडे बिस्किट, ड्रायफ्रूट्स, फळं किंवा हेल्दी स्नॅक्स दिवसभर तोंड चालूच असतं. अनेकांना वाटतं की पौष्टिक पदार्थ खातोय म्हणजे काही नुकसान होणार नाही. पण सतत काही ना काही खात राहण्याची सवय शरीरासाठी चांगली नसते. (How many times do you eat in a day? The habit of munching is bad )यालाच अनेकदा मंचिंग असं म्हटलं जातं. शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ लागतो. पण वारंवार खाण्यामुळे पचनसंस्थेला सतत काम करावं लागतं. त्यामुळे अपचन, पोट फुगणे, जडपणा किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो. काही लोकांना सतत काहीतरी खाण्याची इतकी सवय लागते की खरी भूक आणि फक्त खाण्याची इच्छा यातील फरकच समजेनासा होतो.
विशेष म्हणजे फक्त जंक फूडच नाही तर पौष्टिक पदार्थांचाही अतिरेक त्रासदायक ठरू शकतो. उदाहरणार्थ ड्रायफ्रूट्स, फळं, प्रोटीन बार किंवा हेल्दी स्नॅक्स हे आरोग्यासाठी चांगले असले तरी दिवसभर सतत खात राहिल्यास शरीरात जास्त कॅलरी जाऊ शकतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. अनेकदा हे हेल्दी आहे या विचाराने लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात आणि त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागतो.
सतत खाण्याची सवय रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम करू शकते. वारंवार काहीतरी खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सतत बदलत राहते. त्यामुळे थकवा, सुस्ती किंवा पुन्हा पुन्हा भूक लागल्यासारखं वाटू शकतं. काही वेळा ही सवय भावनिक कारणांमुळेही लागते. ताण, कंटाळा किंवा चिंता कमी करण्यासाठी अनेकजण नकळत खात राहतात. दातांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. दिवसभर काहीतरी खात राहिल्याने तोंडात अन्नकण जास्त वेळ राहतात. त्यामुळे दात किडणे किंवा तोंडाची स्वच्छता बिघडण्याचा धोका वाढतो.
शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्न मिळणं महत्त्वाचं असतं. मधे मधे भूक लागल्यास पौष्टिक पदार्थ खाणं चांगलं, पण सतत तोंड चालू ठेवणं योग्य नाही. ठराविक वेळेत जेवण, पुरेसं पाणी आणि संतुलित आहार यामुळे शरीर अधिक निरोगी राहू शकतं. आजकाल 'हेल्दी स्नॅकिंग'चा ट्रेंड वाढला असला तरी कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते. शरीराची गरज समजून खाणं आणि फक्त सवय म्हणून सतत खात राहणं टाळणं हेच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं.
