महिलांच्या हनुवटीवर केस येणे ही मुळात समस्या नाही. मात्र मुली फारच पॅनिक होतात. मलाच का एवढे फेशियल हेअर येतात मी सुंदर नाही का असे प्रश्न उगाचच मनात यायला लागतात मात्र असे केस केवळ सौंदर्याशी संबंधित नसून शरीरातील काही बदलांचे संकेतही देऊ शकते. (3 reasons why women grow facial hair, see and do remedies at home, skincare tips )चेहऱ्यावर, विशेषतः हनुवटीवर जाड किंवा जास्त केस येण्यामागे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्समधील असंतुलन. स्त्रियांच्या शरीरातही थोड्या प्रमाणात पुरुष हार्मोन (अँड्रोजेन) असतात, पण त्यांचे प्रमाण वाढले तर चेहऱ्यावर केस जास्त दिसू लागतात. हे हार्मोन वाढणे हा ही काही रोग नाही. ते नैसर्गिक आहे.
यामागील एक सामान्य कारण म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. या स्थितीत मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे आणि चेहऱ्यावर केस वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय थायरॉईडचे त्रास, अचानक वजन वाढ, आनुवंशिकता (घरात इतर महिलांनाही अशी समस्या असणे) किंवा काही औषधांचा परिणाम यामुळेही हनुवटीवर केस वाढू शकतात. काही वेळा वाढत्या वयानुसार हार्मोनल बदलांमुळेही ही समस्या जाणवते. त्यामुळे तरुणपणी जास्त फेशियल हेअर नव्हते मात्र वयानुसार वाढायला लागतात हे ही अगदी सामान्य आहे.
हे केस काढण्यासाठी थ्रेडिंग हा सर्वात सोपा आणि त्वरीत उपाय मानला जातो. मात्र थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते, कारण त्या भागातील त्वचा संवेदनशील असते. थ्रेडिंगनंतर लगेच त्या भागाला हात लावणे टाळावे, कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्वचेवर थोडी जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असेल तर थंड पाण्याने हलकेच साफ करावे किंवा बर्फ कापडात गुंडाळून लावल्यास आराम मिळतो.
थ्रेडिंगनंतर लगेच मेकअप किंवा केमिकलयुक्त क्रीम वापरणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचा अधिक लालसर होऊ शकते. त्याऐवजी हलका, सॉफ्ट मॉइश्चरायझर किंवा अॅलोवेरा जेल लावल्यास त्वचा शांत राहते. सूर्यप्रकाशात जाणे टाळावे किंवा बाहेर जाताना सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे, कारण थ्रेडिंगनंतर त्वचा अधिक संवेदनशील होते. हे केस म्हणजे तुम्ही सुंदर नसल्याचं लक्षण वगैरे आहे असे समजू नका अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. तसेच अनेक प्रकारे हे केस काढता येतात. त्यासाठी विविध ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत.
