ziprya marathi movie review : वास्तव मांडणारा झिपऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 05:34 AM2018-06-22T05:34:56+5:302023-08-08T19:28:38+5:30

चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, दीपक करंजीकर यांची झिपऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

ziprya marathi movie review: realistic zippers | ziprya marathi movie review : वास्तव मांडणारा झिपऱ्या

ziprya marathi movie review : वास्तव मांडणारा झिपऱ्या

Release Date: June 22,2018Language: मराठी
Cast: चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, दीपक करंजीकर
Producer: ए. आर. डी प्रोडक्शन्स , दिवास प्रॉडक्शन्सDirector: केदार वैद्य
Duration: २ तास १५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस

रस्त्यावर राहाणारी, ट्रेनमध्ये वस्तू विकणारी, फलाटावर बूट पॉलिश करणारी अनेक मुले आपल्याला रोज पाहायला मिळतात. पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण इतके व्यग्र असतो की, त्यांच्याकडे आपले क्वचितच लक्ष जाते. दोन वेळेचे जेवण मिळण्यासाठी ही मुले काबाडकष्ट करत असतात. पण एवढे करूनही त्यांच्या व्यवसायात असलेले भाई (गुंड) त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा घेऊन टाकतात. या मुलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा झिपऱ्या हा चित्रपट आहे. 
झिपऱ्या (चिन्मय कांबळी), अस्लम (प्रथमेश परब), नाऱ्या (सक्षम कुलकर्णी), पोम्ब्या (अमन अत्तार), गंजू (हंसराज जगताप), दाम्या (देवांश देशमुख) हे स्टेशनवर बूट पॉलिशचा धंदा करत असतात. पण त्यांचा उस्ताद पिंगळ्या (नचिकेत पूर्णपात्रे) त्यांच्याकडून त्यांनी कमावलेला अधिकाधिक पैसा काढून घेत असतो. या गोष्टीला सगळीच मुले कंटाळलेली असतात तर दुसरीकडे या उस्तादची झिपऱ्याची बहीण लीला (अमृता सुभाष) वर वाईट नजर असते. झिपऱ्याला उस्तादचा प्रचंड राग येत असतो आणि एकदा झिपऱ्या आणि उस्तादची स्टेशनवर भांडणं सुरू असताना झिपऱ्याच्या धक्क्याने उस्ताद ट्रेन खाली येतो. उस्तादच्या निधनानंतर सगळी मुले झिपऱ्यालाच आपला उस्ताद मानू लागतात. कितीही मेहनत करायला लागली तरी करायची असे या सगळ्या मुलांचे म्हणणे असते. पण बूट पॉलिशच्या धंद्यात त्यांना खूपच कमी पैसा मिळत असतो. या सगळ्यातून ही मुले कशाप्रकारे मार्ग काढतात, या मुलांच्या आयुष्यात पुढे काय होते हे प्रेक्षकांना झिपऱ्या या चित्रपटात पाहायला मिळते. 
झिपऱ्या आणि त्याच्या मित्रांचे जग दिग्दर्शक केदार वैद्य यांनी खूपच चांगल्या प्रकारे उभे केले आहे. पण चित्रपटाचा शेवट चांगलाच खटकतो. चित्रपटाच्या शेवटी झिपऱ्या मोठा झाला असून एकदम व्यवस्थित कपड्यांमध्ये दाखवण्यात आलेला आहे. त्यावरून त्याची आता परिस्थिती सुधारली आहे असे आपल्या लक्षात येते. पण त्याच्या इतर मित्रांचे काय झाले? त्याची बहीण लीला आता काय करते? झिपऱ्याचे शिक्षण झाले का? तो किती शिकला? त्याने त्याच्या परिस्थितीवर मात कशाप्रकारे केली? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिग्दर्शकाने अनुत्तरीत ठेवली आहेत. 
चित्रपटात व्यक्तिरेखांची रंगभूषा मस्त जमून आली आहे. तसेच दिग्दर्शकाने झोपडपट्टीचा मोहोल, त्या मुलांचे जगणे खूपच चांगल्या प्रकारे मांडले आहे.  चिन्मय कांबळी, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष तसेच अमन अत्तार, देवांश देशमुख यांनी चांगली कामं केली आहेत. दीपक करंजीकर हे चित्रपटात शिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांचा वावर चित्रपटात कमी असला तरी ते लक्षात राहतात. पण खरा भाव खाऊन जातो तो म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने अस्लम ही भूमिका पडद्यावर खूपच चांगल्या प्रकारे उभी केली आहे.
अरुण साधू यांच्या झिपऱ्या या कादंबरीवर आधारित झिपऱ्या हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता आहे. कारण झिपऱ्या या कादंबरीवर प्रेम करणारे अनेकजण आहेत. पण पुस्तकातील झिपऱ्या आणि चित्रपटातील झिपऱ्या याच्यात खूपच फरक जाणवतो. कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर कित्येक काळ झिपऱ्या हे पात्र तुमच्या स्मरणात राहाते. पण चित्रपट संपल्यानंतर तसे होत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर झिपऱ्या नव्हे तर असलम हे पात्र तुमच्या मनात सतत घोंगावत राहाते. त्यामुळे चित्रपटाचा नायक झिपऱ्या असला तरी अस्लम बाजी मारतो.  

Web Title: ziprya marathi movie review: realistic zippers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.