Shrikant Shinde: पक्षांतर्गत असलेले मतभेद कमी करणार; शिंदेसेना पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार : डाॅ. श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:59 IST2026-04-13T11:55:36+5:302026-04-13T11:59:08+5:30
Shrikant Shinde महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, त्या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत

Shrikant Shinde: पक्षांतर्गत असलेले मतभेद कमी करणार; शिंदेसेना पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार : डाॅ. श्रीकांत शिंदे
पुणे: राज्यभरातील संपर्क प्रमुख नव्याने नियुक्त करण्यात आले असून, ज्या भागात शिंदेसेना पक्ष कमकुवत आहे, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी बैठका घेतल्या जात असल्याचे शिंदेसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पुण्याचे संपर्क प्रमुख आणि उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, पुढील तीन वर्षे कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे, एसआयआरचे मॅपिंग सध्या सुरू आहे. ग्रामीण भागात कोणतीही अडचण येत नाही. मात्र, शहरी भागात यामध्ये नावे सापडण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. त्यानंतर झालेल्या नगरपालिकांमध्ये ६० नगराध्यक्ष निवडून आले. महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. त्या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यासाठी नव्याने संपूर्ण राज्यातील संपर्कप्रमुख जाहीर केले आहेत. हे संपर्कप्रमुख आपल्या भागात आढावा बैठका घेत आहेत. तसेच पक्षांतर्गत असलेले मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
पराभवाचे केले आत्मचिंतन
शिदेसेना पक्षाने पुणे महापालिकेची निवडणूक ही स्वतंत्र लढवली. उमेदवारी देण्यावरून आरोप - प्रत्यारोप झाले. मात्र, एकही नगरसवेक निवडून आणता आला नाही. पक्षातील गटबाजी याला कारणीभूत असल्याची चर्चा होती. आता महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.