...अखेर घुंगरू वाजणार! लोककलावंतांची प्रतीक्षा संपली अन् तमाशाला परवानगी मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:10 AM2021-11-25T11:10:09+5:302021-11-25T11:42:06+5:30

तब्बल दीड वर्षाच्या तपानंतर महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम मोकळ्या मैदानात घेण्यास परवानगी दिली आहे.

The wait for the folk artists is over and permission has been granted for the final show state government | ...अखेर घुंगरू वाजणार! लोककलावंतांची प्रतीक्षा संपली अन् तमाशाला परवानगी मिळाली

...अखेर घुंगरू वाजणार! लोककलावंतांची प्रतीक्षा संपली अन् तमाशाला परवानगी मिळाली

Next

पुणे : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणास परवानगी दिली असतानाही तमाशा, शाहिरी, भारूड यांसारख्या लोककलांचे सादरीकरण करण्यास परवानगी मिळण्याबाबत कलावंतांसह आयोजकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कलेचा वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा देत, शासनाने मोकळ्या मैदानांमध्ये सांस्कृतिकसह तमाशा, भारूड, शाहिरीसारखे कार्यक्रमही सादर करण्यास परवानगी असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे गावागावांमधील जत्रा-यात्रांमध्ये ढोलकीची थाप आणि घुंगरांच्या बोलांमधून तमाशाची बारी रंगण्याचा मार्ग खुला झाला आहे.

शासनाने ५० टक्के क्षमतेनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत परिपत्रक काढले. मात्र त्यात लोकनाट्य तमाशाचा उल्लेख नसल्याने पोलीस प्रशासनाकडून कार्यक्रम करण्यास परवानगी मिळत नव्हती, ही बाब मराठी तमाशा लोककलावंत परिषद महाराष्ट्र यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीसप्रमुखांना याविषयी आदेश दिले आहेत. त्यानुसार बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला तसेच टुरिंग टॉकीजला (फिरते सभागृह) कोरोना नियमांचे पालन करून सादरीकरणास परवानगी असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे एक वर्ष खंडित झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीतमहोत्सवाचे आयोजनही करता येणे आयोजकांना शक्य होणार आहे.

''शासनाने खुल्या मैदानात सादरीकरणास परवानगी दिल्याने यात्रा - जत्रांमध्ये कार्यक्रम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन वर्षांमध्ये कार्यक्रम न झाल्याने प्रत्येक पार्टीचे २० ते ३० लाखांचे नुकसान झाले. या निर्णयामुळे कलावंतांची आता खरी ‘दिवाळी’ सुरू  झाली आहे असे लावणी लोककला निर्माता संघाच्या शशिकांत कोठावळे यांनी सांगितले.''  

कार्यक्रमांना परवानगी दिल्याने कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण

''कोरोनाकाळात कलावंतांचे हाल झाले. बेरोजगारीमुळे कलावंतांवर आत्महत्येची वेळ आली. भाजी विकणे, गाड्या धुणे, खाद्यपदार्थांची विक्री करणे यांसारखी कामे करावी लागली. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सगळं सुरळीत सुरू झाले आहे. शासनाने मोकळ्या जागेत कार्यक्रमांना परवानगी दिल्याने कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे नृत्यांगना माया खुटेगावकर म्हणाल्या आहेत.'' 

Web Title: The wait for the folk artists is over and permission has been granted for the final show state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.