PMC Election 2026: गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; भाजपचे सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:09 IST2026-01-03T12:07:42+5:302026-01-03T12:09:45+5:30
PMC Election 2026 निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये आहे

PMC Election 2026: गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; भाजपचे सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय जनता पक्षचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये इतकी असून, ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, पठारे कुटुंबाच्या मालमत्तेत स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा आहे. जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा समावेश असलेली ही संपत्ती २१७ कोटी ९३ लाख रुपयांहून अधिक किमतीची आहे. यासोबतच सार्वजनिक वित्तीय संस्था व इतर देणी मिळून ४६ कोटी ५९ लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याची नोंद आहे. त्यांच्या मालमत्तेत बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांचाही समावेश आहे.
सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित असून त्यांनी COEPमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते गोल्ड मेडलिस्ट राहिले असून शिक्षणानंतर विविध उद्योगांमध्ये यशस्वी वाटचाल करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यंदा ते पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे या देखील प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या उमेदवार आहेत.
राजकीय पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापू पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम अधिक भक्कम झाल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.