"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:20 IST2026-01-03T12:06:56+5:302026-01-03T12:20:21+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.

"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
Ravindra Chavan On Ajit Pawar: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच, ६७ जागांवर झालेल्या बिनविरोध निवडींनी नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या सर्वाधिक ४५ उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर शंका उपस्थित करत भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका केली. तसेच भाजप सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळीच तयार झाल्याचेही अजित पवार म्हणाले. यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे भाजपकडूनही अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.
शुक्रवारी राष्ट्रवादी (अजित पवार) चे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळ फोडला. यावेळी अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले.माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत. मात्र, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना इशारा दिला.
"अजित पवार खुद के गिरेबान मे झांक के देखीये. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. अनेक वर्षे तुम्ही इथे होता तेव्हा काम करायला हवं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व बरोबर नाही एवढं त्यांनी सांगावे," असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
माझे मोदी लाटेमध्ये निघून गेले - अजित पवार
"आमच्या सत्ताकाळात २०१७ पर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, ज्यांना मी पदे दिली होती, ते माझे अनेक सहकारी २०१७ नंतर मोदी लाटेमध्ये निघून गेले. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला 'बेस्ट सिटी ऑफ इंडिया'चा पुरस्कार मिळाला होता. त्या काळात आम्ही महापालिकेला कधीही कर्जात टाकले नाही. उलट ठेवी वाढवल्या. मात्र, गेल्या काही वर्षात जवळपास आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत; पण त्या बदल्यात काम तरी कुठे दिसत आहे?," असं अजित पवार म्हणाले.
"अर्ज भरलेल्या उमेदवारांचा सिनेस्टाइल पाठलाग करून माघार घ्यायला लावली. काहींना गाडीत बसवून धमकावले. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन महापौरांवर झाला. आता त्या माजी महापौर भाजपच्या उमेदवार आहेत. भाजपची राक्षसी भूक वाढली आहे. आधीच जमीन आणि भंगार माफिया सक्रिय असून आता 'खोदाई माफिया' अवतरले आहेत," असा आरोपही पवार यांनी केला.