कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 06:29 PM2024-04-28T18:29:47+5:302024-04-28T18:30:11+5:30

तांदुळवाडी, रुई आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या, म्हणून बारामती एमआयडीसी अस्तित्वात आले

Factories are not useful just by coming to Baramati A conducive environment has to be maintained to run it - Ajit Pawar | कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

बारामती : काहीजण म्हणतात बारामती एमआयडीसीत कोणामुळे कारखाने आले. आम्ही इतक्या दिवस आपण केलं, अशी भुमिका घेतली. आम्ही बॅकफुटवर राहत आमच्या दैवताने केल्याचे सांगत त्यांना मान दिला. त्यांचा नावलाैकीक वाढण्याची काळजी घेतली. पण आमच्या सुध्दा देशाच्या प्रमुखांशी, उद्योजाकांच्या ओळखी आहेत ना, ठीक आहे सुरवातीचा काळात आपण मुख्यमंत्री होतात म्हणुन बारामतीत काही कारखाने आले. परंतु कारखाने नुसते येऊन उपयोग होत नाही. ते कारखाने चालविण्यासाठी पोषक वातावरण ठेवाव लागत, ते ठेवण्याची काळजी आपण घेतली. चंद्रपुरची एमआयडीसी कारखाने बंद पडुन ओस पडली. महाराष्ट्राच्या कित्येेक एमआयडीसीचे  वाटोळे झाले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला.
 
बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, बारामतीच्या तांदुळवाडी, रुइ आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या. त्यामुळे बारामती एमआयडीसी अस्तित्वात आल्याचे पवार म्हणाले.
  
ते पुढे म्हणाले, १४० कोटी जनतेचा कारभाराची हि निवडणुक आहे. सुज्ञ मतदार याचा बारकाइने विचार करतील. मागे वेगवेगळे पंतप्रधान होऊन गेले. मात्र, जनतेशी संपर्क असणारा, शेतकऱ्यांच्या समस्या समजुन घेणारा, त्यांची कामे मार्गी लावण्याचा पायंडा नरेंद्र मोदींनी पाडला. जो यापुर्वीच्या पंतप्रधानांनी पाडलेला नव्हता. दहा वर्ष पंतप्रधान पदावर असताना देखील एक देखील मोदींवर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडला नसल्याचे  पवार यांनी नमुद केले.

वालचंदनगरमध्ये त्यावेळी आर्थिक सुबत्ता होती. त्यावेळी आपल्यातील काही जे आता भाषण करतात, ते वालचंदनगरला शिकायला जात असत. याचा अर्थ बारामतीला चांगले शिक्षण नव्हते, जे शिक्षण वालचंदनगरला चांगले होते. आम्ही राजकारणात आल्यानंतर हे चित्र बदलले. वालचंदनगर, फलटणचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यास येऊ लागले. आज बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदीक महाविद्यालय कोणी आणले. त्यामुळे त्या परिसराचा कायापालट झाल्याचे सांगत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. 

तुम्ही तुमच्या घरच्या सुना आहेत. तुम्ही सुन म्हणुन आल्यानंतर घरचे होता. बाहेरची होत नाही. आमच्यात ४० वर्षानंतर देखील सुन बाहेरचीच म्हणुन उल्लेख केला जातो. आता तुम्हाला राग आला पाहिजे. ४० वर्ष तुमच्या घरात कष्ट करुन देखील तुम्ही तिला बाहेरचीच म्हणता, हा कुठला न्याय, तुम्ही महिलांचा अपमान करता, त्यांना मान सन्मान द्यायला शिका, अशी देखील टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

मुलगी सुन झाल्यावर त्या घरची लक्ष्मी होते. मुलगी माहेरी आल्यावर आई तिला चार दिवस भावजयीबरोबर आनंदामध्ये रहा, असे सांगते.पुढे त्यांना पाेषाख करुन त्यांच्या घरी पाठवा, असं सांगते. मात्र, त्याचा वेगळा अर्थ काढु नका शहाण्यांनो. नणंद घरी आल्यावर तिला साडीचोळी करा, जावयाला पोषाख करुन त्यांची पाठवणी करा, मला म्हणायचं होतं, अर्थात बटण दाबुन नव्हे, अशी मिश्कील टीपणी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. त्यावर उपस्थितांमध्ये हशा  पिकला.

....बारामतीच्या बाॅडीवर मराठवाड्याचे इंजिन बसणार

डायनामिक्स डेअरी आणण्यासाठी तत्कालीन प्रमुख कै.गाेयंका यांना आपणच जमीन दाखविली. त्यानंतर विविध कारखाने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारखाने चालु शकले नाहीत. त्यावेळी विलासराव देशमुख उद्योगमंत्री होते. तर ‘साहेब’ मुख्यमंत्री होते. बारामतीच्या रेल्वे स्टेशनच्या मैदानात सभा झाली. क्राॅम्पटन ग्रीव्हजच्या गाडीबाबत त्यावेळी देशमुख  म्हणाले, बारामतीच्या  बाॅडीवर मराठवाड्याचे इंजिन बसणार, ती गाडी सुसाट धावणार, असे वक्तव्य देशमुख यांनी केल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली.

Web Title: Factories are not useful just by coming to Baramati A conducive environment has to be maintained to run it - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.