अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:57 IST2026-01-16T17:55:29+5:302026-01-16T17:57:09+5:30
Amol Balwadkar Lead, PMC Election Result 2026: बाणेर-बालेवाडीत 'क्रॉस व्होटिंग'चा धमाका! अमोल बालवडकर आघाडीवर, पण भाजपच्या ३ उमेदवारांची मुसंडी

अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...
पुणे: पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी) मध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून लढणारे अमोल बालवडकर यांनी स्वतःच्या जागेवर आघाडी ठेवली आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे याच प्रभागातील इतर तीन जागांवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार आघाडीवर आहेत.
भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे लहू बालवडकर यांच्यावर ५१० मतांची निसटती पण महत्त्वाची आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकतील असा दावा केला होता, त्यामुळे अमोल बालवडकरांची ही आघाडी भाजपसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
भाजपचे गणेश कळमकर हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी सभागृह नेते बाबुराव चांदेरे यांच्यापेक्षा ४०४ मतांनी पुढे आहेत. चांदेरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात कळमकरांनी घेतलेली आघाडी हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांना चांगली लढत देत आहेत. मतदारांनी पॅनेलऐवजी वैयक्तिक उमेदवारांना पसंती दिल्याचे या कलांवरून स्पष्ट होत आहे.
बालवडकरांना वैयक्तिक पसंती
अमोल बालवडकर यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तरीही बाणेर-बालेवाडीतील मतदारांनी त्यांच्या वैयक्तिक कामाची दखल घेत त्यांना 'ड' जागेवर आघाडी दिली आहे. बालवडकर आघाडीवर असताना त्यांच्या सोबतच्या राष्ट्रवादीच्या इतर तीन उमेदवारांना मात्र मतदारांनी पसंती दिलेली दिसत नाही. त्याऐवजी भाजपच्या रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
