CoronaVirus Live Updates : मृत्यूचं मॉक ड्रिल! 5 मिनिटांसाठी ऑक्सिजन बंद अन् 22 रुग्णांचा मृत्यू; घटनेने खळबळ, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:27 AM2021-06-08T08:27:17+5:302021-06-08T08:34:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : पाच मिनिटांचं मॉक ड्रील करण्यात आलं आणि ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाग्रस्तांवर देशातील अनेक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ऑक्सिजन अभावी देशातील काही ठिकाणी रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

आग्रामधील पारस रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्णालयाचे संचालकांनी 26 एप्रिलच्या एका घटनेचा उल्लेख करत आहेत. त्यांनी पाच मिनिटांचं मॉक ड्रील करण्यात आलं आणि ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डॉ. अरिंजय जैन यांचा आवाज असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून खासगी रुग्णालयाचे संचालक आणि त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना चुकीची असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याचं देखील सांगितलं आहे.

व्हिडिओमध्ये डॉ. अरिंजय जैन आपल्यासमोर उभा असलेल्या आणि बसलेल्या काही लोकांना 26 एप्रिलच्या त्या रात्रीची घटना सांगत आहेत. यामध्ये त्यांनी आग्रामधील सर्वात मोठ्या ऑक्सिजन पुरवठादाराचा फोन आला होता असं म्हटलं आहे.

कत्ल की रात है. फक्त सकाळपर्यंतचाच माल शिल्लक आहे. मुख्यमंत्रीही ऑक्सिजन मागवू शकत नाहीत. मोदी नगर- गाझियाबाद ड्राय झालं आहे. दिल्लीहूनही गाडी येत नाही आहे. त्यामुळे रुग्णांना डिस्चार्ज द्या असं देखील म्हटलं आहे.

डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड असे 96 रुग्ण भरती होते. रात्री एक वाजता रुग्णांसाठी आवश्यक सूचनेची एक नोटीस तयार केली आणि सर्व वार्डात वाचून दाखवली. व्हायरल होऊ नये म्हणून कुठेही लावली नाही.

रात्री अडीच वाजता रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. लोक एकत्र येऊन एकमेकांसोबत बोलू लागले. सर्वांना समजवलं. मात्र, कोणीही जायला तयार नव्हतं. बाहेर बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं असं म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी प्रभू एन. सिंह यांनी 26 एप्रिलला तीन लोकांचा मृत्यू झाला आणि 27 एप्रिलला पारस रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे. 22 रुग्णांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे असं म्हटलं आहे.

रुग्णालयात गंभीर रुग्ण होते. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे काही चूक आढळून आल्यास कारवाईही केली जाईल असंही ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.