Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:22 PM2024-03-28T13:22:26+5:302024-03-28T14:10:39+5:30

Kangana Ranaut : भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या कंगनाची जोरदार चर्चा रंगली आहे.

फिल्मी दुनियेत आपलं टॅलेन्ट दाखवल्यानंतर कंगना राणौत आता राजकारणात एन्ट्री करणार आहे. भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या कंगनाची जोरदार चर्चा रंगली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान कंगनाला तिचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने तिने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे का?असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं आहे. तिने शाहरुख खानचं नाव घेत सत्य सांगितलं आहे.

कंगना राणौतने स्वतःला आणि शाहरुख खानला 'स्टार्सची शेवटची पिढी' असं म्हटलं. शाहरुख खानचं उदाहरणही दिलं. अभिनेत्रीने सांगितलं की, आपल्या करिअरमधील 'पठान', 'जवान' आणि 'डंकी' या मोठे हिट चित्रपट देण्यापूर्वी शाहरुख खानही कठीण काळातून गेला होता.

टाईम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना म्हणाली, "या जगात असा एकही अभिनेता नाही ज्याने आपल्या करिअरमध्ये एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. शाहरुख खानला 10 वर्षांपासून एकही हिट चित्रपट मिळाला नाही. पण नंतर पठाण हिट झाला."

"मला 7-8 वर्षे एकही हिट मिळाले नाही, पण नंतर चमत्कार झाला. आता इमर्जन्सी येत आहे, मला आशा आहे की हा चित्रपट चांगला चालेल. आता ओटीटीने जग व्यापले आहे, स्टार बनणं सोपं नाही. "

"अनेक कलाकारांना संधी मिळत आहे. आजकाल OTT मुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याच्या अनेक संधी आहेत. आम्ही स्टार्सची शेवटची पिढी आहोत, OTTकडे कोणतेच स्टार्स नाहीत."

"देवाच्या कृपेने आम्हाला खूप मागणी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, मला स्वतःला खऱ्या जगासमोर आणायचं आहे, केवळ कलेच्या जगात जगायचे नाही" असंही कंगनाने म्हटलं आहे.

कंगना राणौतचे शेवटचे तीन चित्रपट - 'तेजस', 'धाकड' आणि 'थलाईवी' हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठे फ्लॉप चित्रपट ठरले आहेत. कंगनाचा नवा चित्रपट इमर्जन्सी 14 जूनला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

इमर्जन्सी चित्रपटाची कथा 1975 मध्ये भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.