Now Film to be made on popular Marathi Play Jago Mohan Pyare | ‘या’ नाटकाचा आता बनणार चित्रपट, सिद्धार्थ जाधवचा ‘मोहन’ रुपेरी पडद्यावर रसिकांचं करणार तुफान मनोरंजन
‘या’ नाटकाचा आता बनणार चित्रपट, सिद्धार्थ जाधवचा ‘मोहन’ रुपेरी पडद्यावर रसिकांचं करणार तुफान मनोरंजन

मराठी रंगभूमीवर सध्या विविध नाटकं रसिकांचं मनोरंजन करत आहेत. विविध आशय आणि आशय असलेल्या दर्जेदार नाटकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रंगभूमीवर येणाऱ्या मराठी नाटकांची संख्या वाढत आहे. नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहून गेल्या काही वर्षांत नाटकांवर आधारित मराठी चित्रपटही रसिकांच्या भेटीला येत आहेत. 'नटसम्राट' या गाजलेल्या नाट्यकलाकृतीवर आधारित नटसम्राट हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर ‘खो खो’ हा चित्रपट तयार झाला. ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकावर ‘टाइमप्लीज’ हा चित्रपट येऊन गेला. 


काही वर्षांपूर्वी ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘गारंबीचा बापू’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’ या नाटकांवरही चित्रपट सादर झाले होते. आता असंच आणखी एक गाजलेलं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं, अभिनेता सिद्धार्थ जाधवला अभिनेता म्हणून वेगळी ओळख दिलेलं 'जागो मोहन प्यारे' हे नाटक आता चित्रपटाच्या रुपानं प्रेक्षकांसमोर येत आहे.  

प्रियदर्शन जाधव या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन करत आहे. मूळ नाटकात मोहनची भूमिका केलेला अभिनेता सिद्धार्थ जाधवसह अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शनही प्रियदर्शन जाधवनंच केलं होतं. चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मराठी रंगभूमीवर दमदार प्रतिसाद मिळवलेल्या 'मोहन'ची नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असणार हे मात्र नक्की.

Web Title: Now Film to be made on popular Marathi Play Jago Mohan Pyare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.