Prakash Ambedkar VBA List: नागपूर काँग्रेसला सोडले, पण उद्धव ठाकरेंच्या दोन उमेदवारांविरोधात वंचित उभे ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:40 IST2024-03-27T12:38:31+5:302024-03-27T12:40:43+5:30
Prakash Ambedkar Candidate Seat vs Uddhav Thacekray Shivsena Fight: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. सर्वच पक्ष आपापले आखाडे बांधत असतात. वंचितनेही कालपर्यंत मविआची वाट पाहिली आणि रात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेत नऊ उमेदवार जाहीर केले आहेत.

Prakash Ambedkar VBA List: नागपूर काँग्रेसला सोडले, पण उद्धव ठाकरेंच्या दोन उमेदवारांविरोधात वंचित उभे ठाकले
राज्यातील राजकारणात उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांशी जुळणार का अशा चर्चाही होत्या. अखेर जेव्हा लोकसभा निवडणुकीची वेळ आली तेव्हा वंचितने मविआसोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे ज्या ठाकरेंसोबत युती झाली त्यांच्याच दोन उमेदवारांविरोधात वंचितने उमेदवार दिले आहेत, तर एका जागेवर त्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर त्याला पाठिंबा जाहीर केला आहे.
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. सर्वच पक्ष आपापले आखाडे बांधत असतात. वंचितनेही कालपर्यंत मविआची वाट पाहिली आणि रात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेत नऊ उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे गटानेही त्यांचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. हे सर्व लागोपाठ झालेले असले तरी ठाकरे गटाच्या तीन जागांवर वंचित आव्हान देणार आहे. तर काँग्रेसने उमेदवार दिलेल्या जागा रामटेक आणि भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर जागांवर वंचितने उमेदवार दिले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे वंचितने कोल्हापूरपाठोपाठ नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर बुलढाणा, यवतमाळ-वाशिम या जागांवर ठाकरे गटाविरोधात वंचित थेट लढत देणार आहे. सांगलीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार आहे. परंतु तिथे वंचित उमेदवार देत नाहीय. तर ओबीसी- बहुजन पार्टीमधून प्रकाश शेंडगे उभे राहिले तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
एकंदरीतच तीन जागांवर उद्धव ठाकरे शिवसेना आणि वंचित यांच्यात लढत होणार आहे. भाजपा किंवा अन्य विरोधी पक्षांचे उमेदवार या जागांवर असणारच आहेत. मते विभागली गेल्याचा फायदा या जागांवर महायुतीला होण्याची शक्यता आहे. वंचितने जाहीर केलेल्या अन्य जागांवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. कारण उर्वरित जागा या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या नाहीत. या दोन्ही पक्षांचे काही उमेदवार अद्याप जाहीर व्हायचे आहेत. ठाकरे गटाच्या जागांवर वंचितने उमेदवार दिल्याने या दोन जागांवर वंचितने दावा केलेला का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.