Maharashtra Election 2019 : एकतर्फी लढतीत बंडखोर अपक्षांनी भरले रंग, कुणाचा होणार बेरंग

By बाळकृष्ण परब | Published: October 9, 2019 11:12 AM2019-10-09T11:12:03+5:302019-10-09T11:15:20+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एकीकडे राज्यात भाजपा आणि शिवसेनेने महायुतीची गाठ मारत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी काही ठिकाणी युतीधर्म मोडून परस्परांविरोधात बंडाचा झेंडा उभा केल्याने एकतर्फी लढतीत रंग भरले आहेत.

Maharashtra Election 2019 : Interesting fight in Sindhudurg district Between Shiv sena & BJP | Maharashtra Election 2019 : एकतर्फी लढतीत बंडखोर अपक्षांनी भरले रंग, कुणाचा होणार बेरंग

Maharashtra Election 2019 : एकतर्फी लढतीत बंडखोर अपक्षांनी भरले रंग, कुणाचा होणार बेरंग

Next

- बाळकृष्ण परब 

विधानसभा निवडणुकीतील लढतींचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. एकीकडे राज्यात भाजपा आणि शिवसेनेने महायुतीची गाठ मारत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेचे बंडखोर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. विशेषकरून राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर एकमेकांविरुद्ध झालेली बंडखोरी आणि स्थानिक नेत्यांकडून बंडखोरांची होत असलेली उघड पाठराखण यामुळे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व नाममात्रच राहिले असल्याने येथील निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी युतीधर्म मोडून परस्परांविरोधात बंडाचा झेंडा उभा केल्याने एकतर्फी लढतीत रंग भरले आहेत. त्यामुळे आता या लढतीत कुणाचा बेरंग होतो आणि कुणाच्या विजयाचा गुलाल उधळतो याकडे तमाम जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास राणेंच्या पक्षांतरानंतर कमकुवत झालेली शिवसेना गेल्या पाच सहा वर्षांत पुन्हा एकदा बऱ्यापैकी मजबूत झाली आहे. तर केंद्र आणि राज्यातील सत्तेचा फायदा घेत भाजपानेही बऱ्यापैकी हातपाय पसरले आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी केलेला पक्षप्रवेश आणि त्यामुळे मिळालेले स्वाभिमान पक्षाचे अतिरिक्त बळ यामुळे भाजपा अधिकच भक्कम झाला आहे. दुसरीकडे नारायण राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसची अवस्था अगदीच कमकुवत झाली आहे. तर राष्ट्रवादीचीही काँग्रेसहून वेगळी स्थिती नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यात एकमेकांचे सहकारी असलेले भाजपा आणि शिवसेना सिंधुदुर्गात मात्र एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यातच शिवसेनेचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना भाजपाने पक्षात प्रवेश देऊन कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने युतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 

जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर विरुद्ध भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली अशी प्रमुख लढत होत आहे. तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध रणजीत देसाई अशी लढत होत आहे, रणजीत देसाई यांना भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचे तसेच नारायण राणेंचे पाठबळ मिळालेले आहे. तसेच युतीमधील जागावाटपानुसार कणकवली मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेला असतानाही शिवसेनेने थेट आपल्या चिन्हावर उमेदवार उतरवला आहे. येथे नितेश राणेंना नारायण राणेंचे काही दिवसांपूर्वीपर्यंतचे निष्ठावान सहकारी सतीश सावंत आव्हान देत आहे. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांनी विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीमधून तर 2014 मध्ये शिवसेनेमधून ते विधानसभेत पोहोचले होते. यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावक यांचे आव्हान आहे. मात्र मुख्य लढत ही केसरकरविरुद्ध तेली अशीच होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना भक्कम स्थितीत आहेत. गेल्या निवडणुकीत केसरकर यांनी या मतदारसंघात भाजपा उमेदवार असलेल्या तेलींचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला सुमारे 29 हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र मागच्या तुलनेत आघाडीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपाचे बंडखोर असलेल्या राजन तेली यांना भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात युती नावापुरतीच उरली आहे. तसेच सावंतवाडीतील बबन साळगावकर हेही राष्ट्रवादीकडून लढत असल्याने दीपक केसरकर यांना मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत चित्र पाहता येथे केसरकर आणि तेली यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कुडाळ-मालवणमध्ये यावेळी शिवसेनेचे वैभव नाईक आणि राणे समर्थक रणजीत देसाई यांच्यात लढत होत आहे. तांत्रिक कारणामुळे दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रणजीत देसाई यांचे नाव ऐनवेळी पुढे आले आहे. मात्र सावंतवाडीप्रमाणेच येथेही शिवसेनेविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजपा आणि स्वाभिमानचे पाठबळ मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत येथे वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांना 10 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेनेच्या उमेदवाराला 9 हजारांची आघाडी मिळाली होती. तसे पाहायला गेल्यास येथे शिवसेना आणि नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे बलाबल समसमान आहे. मात्र गेल्या काही दिवसांत वैभव नाईक यांनी स्वाभिमानच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधत वैभव नाईक यांनी राणेंवर कुरघोडी केली आहे. मात्र गतवेळच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी स्वाभिमानचे कार्यकर्ते उत्सुक आहे. त्यामुळे येथेही रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. 

मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेळी सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरणार आहे ती कणकवली मतदारसंघात. येथे नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेल्या नितेश राणेंसमोर सतीश सावंत यांनी आव्हान उभे केले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात नितेश राणे यांनी दणदणीत विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला होता. जिल्ह्यातील अन्य दोन मतदारसंघांच्या तुलनेत येथे नारायण राणेंची ताकदही बऱ्यापैकी आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांना या मतदारसंघामधून  11 हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र आता काही दिवसांपूर्वीपर्यंत नारायण राणेंचे सहकारी असलेले सतीश सावंत हेच नितेश राणेंना आव्हान देत असल्याने लढतीत रंगत आली आहे. त्यातच भाजपाने नितेश राणेंना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने शिवसेनेने या मतदारसंघात थेट युती मोडत पक्षाच्या चिन्हावर सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र स्वाभिमानचे बळ आणि भाजपाचे पाठबळ यामुळे येथे नितेश राणेंचे पारडे काहीसे जड आहे. पण शिवसेनेनेही पूर्ण ताकद पणाला लावल्याने आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या सतीश सावंत यांचाही जनाधार बऱ्यापैकी असल्याने ही लढत एकतर्फी होणार नाही एवढे नक्की. 
|
एकंदरीत बलाढ्य महायुती आणि कमजोर आघाडी यामुळे सिंधुदुर्गात एकतर्फी होऊ शकणारी निवडणूक बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमुळे रंगतदार झाली आहे. आता मालवणी मतदार विजयाचा गुलाल कुणाच्या भाळी लावतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 
 

Web Title: Maharashtra Election 2019 : Interesting fight in Sindhudurg district Between Shiv sena & BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.