Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:39 IST2019-10-01T16:31:37+5:302019-10-01T16:39:26+5:30
माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करून घेतला होता.

Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत भाजपाने विद्यमान 12 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले असून, 52 विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर कारंजा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी याच अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेणारे माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पत्ता कट झाला आहे.
भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला होता. भाजपा-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला यावा यासाठी खासदार भावना गवळी आणि स्थानिक शिवसैनिकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र ऐनवेळी आता या मतदारसंघातून पुन्हा आमदार पाटणी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करून घेतला होता. मात्र पाटणी यांच्या उमेदवारीमुळे आता माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे डहाके आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.