माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:03 PM2024-04-15T15:03:47+5:302024-04-15T15:04:33+5:30

loksabha Election 2024 - माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख, रासपचे महादेव जानकर अशी तिरंगी लढत झाली होती.

Lok Sabha Election 2024 - Direct fight between BJP and NCP in Madha Constituency, how will be the politics of Sangola Constituency | माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

अरुण लिगाडे

सांगोला : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर लोकसभेच्या झालेल्या तीन निवडणुकांपैकी दोन निवडणुकीत सांगोल्यातून शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख, आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहिले तर सन २०१९ निवडणुकीत स्व. गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे दोन नेते राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्यासोबत तर आमदार शहाजीबापू पाटील हे भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत होते. आता मात्र, शहाजीबापू आणि दीपकआबा महायुतीसोबत, तर शेकापचे देशमुख हे महाविकास आघाडीकडे आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख, रासपचे महादेव जानकर अशी तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी गणपतराव देशमुख, शहाजीबापू पाटील व दीपक साळुंखे पाटील हे तिघेही शरद पवार यांच्यासोबत होते. त्यावेळी सांगोल्यातून शरद पवार यांना सुमारे ९९ हजार मते मिळाली होती. देशमुख यांना ३२ हजार तर जानकर यांना ३० हजार मते मिळाली होती.

पुन्हा सन २०१४ मध्ये गणपतआबा, शहाजीबापू आणि दीपकआबा तिघे राष्ट्रवादीचे विजयदादासोबत असतानाही सांगोल्यातून महायुतीचे सदाभाऊ यांना १६,५०० मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर सन २०१९ ला निवडणुकीतही स्व. गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपकआबा हे संजय शिंदे यांच्यासोबत तर आमदार शहाजीबापू हे निंबाळकर यांच्यासोबत राहिले.

आबांच्या पश्चात पहिलीच लोकसभा निवडणूक
आज सांगोल्यातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. स्व. गणपतराव देशमुख यांच्याविना लोकसभेची निवडणूक होत आहे. आमदार शहाजीबापू आणि दीपकआबा हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत आहेत तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख बंधूसह, काँग्रेस (आय) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मोहिते-पाटील यांच्यासोबत असेल.

उमेदवारीसाठी प्रयत्न, तरीही...
उमेदवारी मिळविण्यासाठी अनिकेत देशमुख यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हेही माढ्याची जागा शेकापला सोडण्याची मागणी केली होती. मात्र, उमेदवारी कोणाला मिळो, एकत्र राहण्याचा राजकीय करार अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर झाला होता. त्यानुसार रणनीती आखण्यात येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगोल्यातून भाजपाला ७८,७४६ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीने ८२,१२० मते मिळाले तेव्हा राष्ट्रवादीला ३,३७४ मताधिक्य मिळाले होते.

Web Title: Lok Sabha Election 2024 - Direct fight between BJP and NCP in Madha Constituency, how will be the politics of Sangola Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.