'मनसे'चा गुडीपाडवा मेळावा उर्मिला मातोंडकरच्या पथ्यावर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:13 PM2019-04-03T13:13:55+5:302019-04-03T13:14:47+5:30

२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविणारे राज ठाकरे यांनी यावेळी मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे.

Lok Sabha Election 2019 MNS's Gidipadwa rally beneficial for Urmila Matondkar? | 'मनसे'चा गुडीपाडवा मेळावा उर्मिला मातोंडकरच्या पथ्यावर ?

'मनसे'चा गुडीपाडवा मेळावा उर्मिला मातोंडकरच्या पथ्यावर ?

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. परंतु, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे झोप उडणार हेही तितकेच खरं आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविणारे राज ठाकरे यांनी यावेळी मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे.

काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदार संघातून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहे. मराठी मतांवर डोळा ठेवूनच काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी दिले असून उर्मिला देखील मतदारांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा उर्मिलासाठी फायद्याचा ठरणार हे निश्चितच आहे.

त्यातच आता मनसेचा गुडीपाडवा मेळावा शनिवारी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या महासचिव शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. तसेच मोदी-शाह विरोध कशासाठी समजून घेण्यासाठी शिवाजी पार्कवर या, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनसेने लोकसभेसाठीची आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे मनसेकडून उर्मिलाला मदत मिळणार का, मराठमोळ्या उर्मिलाच्या पाठिशी मनसे सैनिक पूर्ण ताकतीने उभे राहतील का, असे अनेक प्रश्न मेळाव्यापूर्वी उपस्थित होत आहे. मराठीच्या मुद्दावर मनसेने उर्मिलाला पाठिंबा दिल्यास लोकसभा निवडणुकीसाठीचा तिचा मार्ग काही अंशी सुकर होणार आहे.

मुंबई उत्तर मतदार संघात उर्मिलासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान आहे. गोपाळ शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. याआधी या मतदार संघातून अभिनेता गोविंदाने २००४ मध्ये भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. यामुळे सेलिब्रेटीसाठी हा मतदार संघ अनुकूल असल्याचे त्यावेळी दिसून आले होते. त्यावेळीप्रमाणेच उर्मिलाला देखील सेलिब्रेटी असण्याचा फायदा या निवडणुकीत होईल, का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 MNS's Gidipadwa rally beneficial for Urmila Matondkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.