Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:29 IST2024-11-20T19:27:56+5:302024-11-20T19:29:28+5:30
Exit Poll of Maharashtra Latest Update: बहुतांशी एक्झिट पोलचे आकडे हे कोणाला निर्विवाद बहुमत मिळताना दाखवत नाहीत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागा लागणार आहेत. दोन्ही युती आघाडी याच काठावर पास होताना दिसत आहेत.

Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
राज्याचे मतदान थोड्या वेळापूर्वीच संपले. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कटेंगे तो बटेंगे, सोयाबिन, कापूस, लाडकी बहीण योजना या मुद्द्यांभोवतीच घुटमळत होती. महायुती आणि मविआ हे मुद्दे आपल्या बाजुने कसे वळतील याचा प्रयत्न करत होते. अखेर मतदान संपले आणि एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार एक मात्र नक्की आहे की भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे, तर काँग्रेस सर्वाधिक फायद्यात असलेला पक्ष ठरणार आहे.
दैनिक भास्करनुसार बहुतांशी एक्झिट पोलचे आकडे हे कोणाला निर्विवाद बहुमत मिळताना दाखवत नाहीत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागा लागणार आहेत. दोन्ही युती आघाडी याच काठावर पास होताना दिसत आहेत. सरासरी भाजपाला ८०-९० जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे गेल्यावेळपेक्षा भाजपाला १५-२५ जागांवर नुकसान होताना दिसत आहे.
दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहणार असून या पक्षाला ५८-६० जागा मिळताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.
शरद पवारांनाही मोठा फायदा होताना दिसत आहे. यावेळच्या एक्झिट पोलमध्ये त्यांना ५०-५५ जागांवर जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार गेल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे आमदार शरद पवारांकडे होते.
उद्धव ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३०-३५ जागांवरच स्पर्धा करताना दाखविण्यात येत आहे. तर अजित पवारांचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. राष्ट्रवादीला 15-20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. अजित पवारांना हा मोठा फटका आहे.
बाकी अपक्ष, छोट्या पक्षांना, महाशक्तीला २०-२५ जागा मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेची खरी चावी याच लोकांकडे असणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेचे २-४ उमेदवार जिंकू शकतात, असा अंदाज आहे. सपाला १ जागा मिळताना दिसत आहे.