"जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर..."; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:08 IST2026-01-21T15:07:46+5:302026-01-21T15:08:21+5:30
खरेतर भाजपा-शिवसेना महायुतीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण नव्हती असं दरेकरांनी म्हटलं.

"जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर..."; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?
मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेने मनसेचा पाठिंबा घेतला आहे. केडीएमसीत महापौर आणि सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी शिंदेसेनेने मनसेला सोबत घेत एकप्रकारे भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांमधून प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्यात. महायुती म्हणूनच कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन होईल. महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा करून शिंदेंसोबत संवाद साधून त्याठिकाणी महायुतीची सत्ता बसेल असं सांगत एकनाथ शिंदेंच्या खेळीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सूचक विधानही केले आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, भाजपाला अजिबात धक्का मानायचं कारण नाही. शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी कुणी समर्थन देत असेल आणि पाठिंबा देत असेल तर घेतला जातो. शहराच्या विकासाच्या भूमिकेवर मनसे-शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा भाग बनत असेल तर त्याचे स्वागत आहे. खरेतर भाजपा-शिवसेना महायुतीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण नव्हती. परंतु शिवसेनेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना घटक पक्षांना सोबत घ्यायचे असेल तर काही अडचण नाही असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातील नेते घ्यायचे नाहीत हे ठरले होते ही वस्तूस्थिती आहे. तथापि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महायुती अभेद्य असेल. कल्याण डोंबिवलीत जी सत्ता स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल. भाजपा हा एवढा विशाल पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबाबत कुणी काय बोलू शकत नाही. भाजपा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांच्या खेळी, डावपेच हे भाजपासाठी दुय्यम ठरतात. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जर खेळी केली तर काय होते महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांना ज्यांनी राजकीय दृष्ट्या चित केले तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार? असा इशाराच अप्रत्यक्षपणे प्रविण दरेकर यांनी शिंदेसेनेला दिला.
दरम्यान, महायुती म्हणून आम्ही मनसेला सोबत घेतले नाही. शिवसेनेने मनसेला सोबत घेतले आहे. शेवटी घटक पक्ष वाढवणे हा शिवसेनेचा अधिकार आहे परंतु महायुती म्हणून सत्तास्थापनेचा निर्णय रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासाठी एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधून करतील तोच निर्णय अंतिम असेल असं दरेकरांनी स्पष्ट सांगितले.
उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास नाही
जसा राजा तशी प्रजा..उद्धव ठाकरे जसे लोकांसाठी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी नॉट रिचेबल राहतात तसे आता नगरसेवकांची पाळी आली. आता उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. विकासाबाबत त्यांच्याकडून काय होईल याचा भरवसा नाही. त्यामुळे विकासाच्या बाजूने जो मतदारांसमोर गेलेला असतो त्यामुळे अशा गोष्टी त्यातूनच घडत असतात असं सांगत दरेकरांनी नॉट रिचेबल नगरसेवकांवर भाष्य केले.