LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:36 PM2024-05-08T12:36:37+5:302024-05-08T12:37:31+5:30

मोबाइलद्वारे ईव्हीएमचे व्हिडीओ चित्रीकरण

Violation of code of conduct, case filed against 5 persons in Kolhapur | LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : सोशल मीडियावर निवडणुकीच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या जिल्ह्यात ११ घटना निदर्शनास आल्या असून, यातील ५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येडगे म्हणाले, सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन निवडणुकीच्या आचारसंहितचे उल्लंघन करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. याचे उल्लंघन, गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी वेगळी टीम कार्यरत केली होती. अनेकांनी मतदान करताना मोबाइलद्वारे व्हिडीओ शूटिंग करत ते व्हायरल केले आहे. यामुळे मतदान गोपनीयतेचा भंग झाला आहे. असे प्रकार जिल्ह्यात ११ ठिकाणी आढळून आले आहेत.

यात चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील असे प्रकार करणाऱ्या लोकांची ओळख पटली आहे. यातील पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे येडगे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पाेलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

ईव्हीएम मशीनचे चित्रीकरण

मतदान केंद्रात जाताना मोबाइल नेऊ नका, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्याचे उल्लंघन करत मोबाइलद्वारे ईव्हीएमचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे येडगे यांनी सांगितले.

Web Title: Violation of code of conduct, case filed against 5 persons in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.