धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार 

By विश्वास पाटील | Published: May 2, 2024 01:56 PM2024-05-02T13:56:23+5:302024-05-02T13:58:23+5:30

'मोदी यांचे विधान सामाजिक तणाव वाढविण्यासाठीच'

The concept of reservation in the name of religion is not acceptable, if it is given, we will oppose it says Sharad Pawar | धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार 

धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार 

कोल्हापूर : देशात धर्माच्या नावांवर आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनीही असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध करू. सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच पंतप्रधान अशी विधाने करत असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.

पवार म्हणाले, आम्हाला धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच अमान्य आहे. इंडिया आघाडीचा कोणताही नेता तसे म्हटलेला नाही. आम्ही जातींचे सर्व्हेक्षण करणार आहोत. त्यामुळे आरक्षणाच्या लाभापासून किती गोरगरिब समाज अजूनही बाजूला राहिला आहे यासंबंधीचे नेमके चित्र समोर येईल.

तामिळनाडूसारख्या राज्यात एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात. मात्र, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यकर्त्यांना जनमत न मिळण्याची चिंता आहे. पंतप्रधान मोदी यांना प्रत्येक मतदारसंघात जाता यावे यासाठी मतदानाचे जाणीवपूर्वक पाच टप्पे केल्याचा आरोपही पवार यांनी केला.

४२-६ हे चित्र यावेळेला बदलेल..

महाराष्ट्रात गेल्या निवडणूकीत ४२-६ असे चित्र होते. ते यावेळेला बदलेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या निवडणूकीत मला दोन गोष्टी प्रकर्षाने दिसत आहेत. एक म्हणजे शेतकरी या सरकारच्या धोरणाबध्दल नाराज आहे आणि गेल्या निवडणूकीत मोदी मोदी करणाऱ्या तरुण पिढीचा उत्साह कमी झाला आहे.

कांद्याची निर्यातबंदी चुकीचीच

कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायती भागातील आहे. त्यांच्या उत्पादनाला चांगले पैसे मिळावेत यासाठी आमच्या काळात कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कांद्याच्या माळा घालून भाजपच्या लोकांनी त्याला विरोध केला. मात्र, ही परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली. सध्याच्या सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे पवार यांनी सांगितले.

फडणवीस यांनाही माहीत नाही अशा जोडण्या

कोल्हापुरात तुम्हाला कोण कोण येऊन भेटून गेले याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी तसे अनेकजण भेटत असतात. काहीजण गुपचुप भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत होणार नाहीत अशा जोडण्या लावत असतो असे सांगत फिरकी घेतली.

Web Title: The concept of reservation in the name of religion is not acceptable, if it is given, we will oppose it says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.