'दृश्यम ३'मध्ये तब्बूच्या नवऱ्याच्या भूमिकेत रजत कपूर पुन्हा दिसणार? अभिनेता म्हणाला- "माझा रोल फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:22 IST2025-12-26T12:21:14+5:302025-12-26T12:22:20+5:30
आधीच्या दोन भागांप्रमाणे रजत कपूर दृश्यम ३ मध्ये पुन्हा दिसणार का? अभिनेत्याने दिलेलं उत्तर चर्चेत

'दृश्यम ३'मध्ये तब्बूच्या नवऱ्याच्या भूमिकेत रजत कपूर पुन्हा दिसणार? अभिनेता म्हणाला- "माझा रोल फक्त..."
सध्या सगळीकडे 'दृश्यम ३' सिनेमाची चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी 'दृश्यम ३'ची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यात बॅकग्राऊंडला अजय देवगणचा आवाज ऐकायला मिळाला. पुन्हा एकदा 'दृश्यम ३'मध्ये मीरा देशमुख म्हणजेच तब्बू आणि अजय देवगण आमनेसामने येणार आहेत. अशातच 'दृश्यम ३'मध्ये मीरा देशमुखचा नवरा अर्थात अभिनेता रजत कपूर दिसणार का? त्याचा रोल कसा असणार? याविषयी अभिनेत्याने खुलासा केलाय.
रजत कपूर 'दृश्यम ३'विषयी काय म्हणाला?
स्क्रीन मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत रजतने सांगितलं की, '''दृश्यम ३'मध्ये माझ्या भूमिकेत कोणताही मोठा बदल होताना दिसणार नाही. माझ्या भूमिकेत तसंही काही खास नाही. मी एका पोलीस अधिकाऱ्याच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. मी प्रत्येकवेळी नवऱ्याच्या नात्याने तब्बूच्या मागे ठामपणे उभा असतो. बास्स इतकंच. बाकी कोणताही नवीन ट्विस्ट यात नाही. यावेळीही मी तब्बूच्या मागेच उभा असलेला तुम्हाला दिसेल.'', अशा गंमतीशीर अंदाजात रजत कपूरने उत्तर दिलं.
कधी रिलीज होणार 'दृश्यम ३'?
'दृश्यम ३'मध्ये अजय देवगणसोबतच तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इतर मूळ कलाकार या तिसऱ्या भागातही पाहायला मिळतील. याशिवाय दुसऱ्या भागात दिसलेला अक्षय खन्ना 'दृश्यम ३'मध्ये दिसणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. अक्षय खन्ना दिसणार की नाही? हे चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.
'स्टार स्टुडिओ १८' प्रस्तुत आणि 'पॅनोरमा स्टुडिओ'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत. या कथेचे लेखन अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवीज शेख यांनी केले आहे. आलोक जैन, अजित आंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांना २ ऑक्टोबर २०२६ ची उत्सुकता आहे.