मी बाळगू कशाला लठ्ठपणाची लाज गं...? ; वनिताचे न्यूड फोटो शूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:46 IST2021-01-05T06:45:13+5:302021-01-05T06:46:06+5:30
Vanita Kharat: सुंदरतेबद्दलतेचा जो ‘टॅबू’ तयार झाला आहे. तोच कुठंतरी ‘ब्रेक’ झाला पाहिजे, यासाठी ‘फोटो शूट’ केलं, असं ती म्हणाली. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या या ‘न्यूड फोटो शूट’ची जोरदार चर्चा आहे.

मी बाळगू कशाला लठ्ठपणाची लाज गं...? ; वनिताचे न्यूड फोटो शूट चर्चेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “गोरा रंग, सडपातळ बांधा, आखीव-रेखीव शरीरयष्टी म्हणजेच ‘सुंदरता’. हेच लहानपणापासून मनावर बिंबवण्यात येते. आपण त्याच नजरेतून पाहतो. का? लठ्ठ मुली सुंदर नसतात?” असा प्रश्न करीत अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोग्राफी (नग्न छायाचित्रण) करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
“लठ्ठ मुलींच्या आयुष्यात कधी कुणावर प्रेम जडत नाही का? त्यांच्यावर कुणी प्रेम करीत नाही का? परीकथेमधली ’परी’ पण छान बाहुलीसारखीच का? दिसायला हवी?” असे प्रश्न वनिताने उपस्थित केले. सुंदरतेबद्दलतेचा जो ‘टॅबू’ तयार झाला आहे. तोच कुठंतरी ‘ब्रेक’ झाला पाहिजे, यासाठी ‘फोटो शूट’ केलं, असं ती म्हणाली. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या या ‘न्यूड फोटो शूट’ची जोरदार चर्चा आहे.
‘लोकमत’शी बोलताना वनिता म्हणाली, मला माझ्या शरीराबद्दल कधीच लाज वाटली नाही. लठ्ठ असल्याने आमच्यासारख्या अभिनेत्रींना कायमच साचेबद्ध भूमिका दिल्या जातात. याचं खूप वाईट वाटतं. मी ’कबीर सिंग’मध्ये भूमिका केल्यानंतर मोलकरणीच्याच भूमिका मला येऊ लागल्या. आम्ही आयुष्यभर आजी, आई, मामी, काकू अशाच भूमिका फक्त करीत राहायंच का? हे कुठेतरी बदलायला हवे. लोकांची मानसिकता बदलायला हवी.
लहानपणापासून असे संस्कार केले जातात की बायको ही गोरी, सडपातळ हवी. या प्रमाणबद्ध सौंदर्याची व्याख्या केली तर केवळ २ टक्केच सुंदर असू शकतील. उर्वरित ९८ टक्के महिला न्यूनगंड घेऊन जगतील. याबाबत अभिव्यक्त होणं गरजेचं वाटलं.”
- अभिजित पानसे, दिग्दर्शक