राणी मुखर्जीला टक्कर देणारी 'अम्मा' आहे तरी कोण? 'मर्दानी ३'मधील खलनायिकेची सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:30 IST2026-01-13T14:29:17+5:302026-01-13T14:30:36+5:30
शिवानी शिवाजी रॉय विरुद्ध 'अम्मा', कोण आहे राणी मुखर्जीला नडणारी 'ही' अभिनेत्री?

राणी मुखर्जीला टक्कर देणारी 'अम्मा' आहे तरी कोण? 'मर्दानी ३'मधील खलनायिकेची सोशल मीडियावर चर्चा
२०२६ हे वर्ष चित्रपटप्रेमींसाठी धमाका ठरणार आहे. 'बॉर्डर २'च्या चर्चेनंतर आता 'मर्दानी ३' च्या धमाकेदार ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या कडक पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत परतली आहे. पण यावेळी चर्चा राणीपेक्षा जास्त तिच्यासमोर उभ्या असलेल्या खलनायिकेची म्हणजेच 'अम्मा'ची होत आहे.
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आणि काही तासांतच तो व्हायरल झाला. यावेळी शिवानी शिवाजी रॉय एका अत्यंत भयानक रॅकेटचा पर्दाफाश करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये एका महिला खलनायिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचं नाव आहे 'अम्मा'. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मल्लिका प्रसाद हिने.
'अम्मा' या भूमिकेला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मल्लिका प्रसाद भारावून गेली. ती म्हणाली, "अम्मा ही व्यक्तिरेखा वाईट प्रवृत्तीची आहे, पण तिच्यात एक प्रखर आत्मा आहे. तिला पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. अशा भूमिका तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतात आणि स्वतःच्या अंधाराशी समोरासमोर बसायला भाग पाडतात. स्वतःपेक्षा मोठ्या सत्याशी प्रामाणिक राहण्याचे आव्हान अम्माने मला दिले, ज्याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती". तिने पुढे प्रेक्षकांचे आभार मानताना म्हटले की, "तुमची ऊर्जा आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते. या संपूर्ण प्रक्रियेचा मी मनापासून आनंद घेतला असून मी अत्यंत कृतज्ञ आहे"
'अम्मा'ची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आहे की, लोक मल्लिका प्रसादबद्दल इंटरनेटवर सर्च करत आहेत. मल्लिका ही केवळ अभिनेत्री नाही, तर ती एक दिग्दर्शक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि अभिनय शिक्षिका देखील आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या मल्लिकाने लंडन विद्यापीठाच्या गोल्डस्मिथ्स कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
तिने १९९९ मध्ये 'कानुरु हेग्गादिथी' या चित्रपटातून पदार्पण केले. २००१ मधील 'गुप्तगामिनी' या चित्रपटातील तिची मुख्य भूमिका कन्नड प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली. मल्लिकाने मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यासोबत 'द किलर सूप' या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच अनुराग कश्यपच्या 'ऑलमोस्ट प्यार'मध्येही ती दिसली होती. तिने 'फॉर माय एला' नावाचा लघुपट दिग्दर्शित केला असून, त्यासाठी तिला लॉस एंजेलिस इंडी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारही मिळाले आहेत.