ही' कॉमेडी वेबसीरिज नेटफ्लिक्सवर नंबर १ ला करतेय ट्रेंड, IMDb वर १० पैकी ८.२ रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:26 IST2025-12-15T17:25:37+5:302025-12-15T17:26:18+5:30
प्रेक्षकांना ही विनोदी सीरिज इतकी आवडली आहे की, ती सध्या नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

ही' कॉमेडी वेबसीरिज नेटफ्लिक्सवर नंबर १ ला करतेय ट्रेंड, IMDb वर १० पैकी ८.२ रेटिंग
ओटीटीवर मनोरंजनाची रेलचेल असते. पण इतक्या सगळ्या चित्रपट आणि सीरिजमधून काय पाहावं आणि काय नाही, हे ठरवताना अनेकदा गोंधळ होतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक धमाकेदार कॉमेडी वेबसीरिज घेऊन आलो आहोत, जी ओटीटीवर प्रदर्शित होताच 'मस्ट वॉच' ठरली आहे. प्रेक्षकांना ही विनोदी सीरिज इतकी आवडली आहे की, ती सध्या नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
"सिंगल पापा" असं या सीरिजचं नाव आहे. अभिनेता कुणाल खेमूची मुख्य भुमिका असलेली "सिंगल पापा" ही वेबसीरिज ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्सनं परिपुर्ण आहे. सहा भागांच्या या सीरिजमध्ये कुणालशिवाय, मनोज पाहवा, आयेशा रझा, प्राजक्ता कोळी, नेहा धुपिता, ईशा तलवार आणि दयानंद शेट्टी हेदेखील कलाकार आहेत. सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये कुणाल खेमूची 'सिंगल पापा' पहिल्या क्रमांकावर असून, 'दिल्ली क्राइम' ही लोकप्रिय सीरिज चौथ्या क्रमांकावर आहे.
काय आहे वेबसीरिजची कथा?
१२ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'सिंगल पापा' ही वेबसीरिज एका अशा व्यक्तीची आहे, जो अचानक एका महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तयार होतो. ही जबाबदारी पेलण्यासाठी तो हळूहळू स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणतो. या सीरिजमध्ये कुणाल खेमू हा गौरव गेहलोत हे पात्र साकारत आहे. जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या गौरव गेहलोत याला एके दिवशी अचानक त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर एक लहान मूल सापडतं. गौरव त्या लहान मुलाच्या इतका प्रेमात पडतो की त्या बाळाला दत्तक घेण्याचं ठरवतो. गौरवच्या या निर्णयाने त्याचे कुटुंब आश्चर्यचकित होतं. तो दत्तक संस्थेच्या नियमांचे पालन करण्यास तयार असला तरी, तिथे काम करणाऱ्या श्रीमती नेहरा त्याला मूल देण्यास तयार नसतात. या सीरिजला IMDb वर १० पैकी ८.२ रेटिंग मिळालं आहे.